बिनविरोध जागांवर महिलांचा वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:25 IST2021-01-13T05:25:52+5:302021-01-13T05:25:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कळंब : तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, एकीकडे निवडणूक होत असलेल्या ५३ गावांमधील ...

Women's spectacles in unopposed seats | बिनविरोध जागांवर महिलांचा वरचष्मा

बिनविरोध जागांवर महिलांचा वरचष्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंब : तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, एकीकडे निवडणूक होत असलेल्या ५३ गावांमधील ४०६ जागांसाठी एक हजारावर उमेदवार फडात उतरले असताना दुसरीकडे मात्र एकही अर्ज दाखल न झाल्याने दोन गावांमधील चार जागा चक्क रिक्त राहिल्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील एकूण १८ गावांमध्ये ४१ जागा तसेच सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, या उमेदवारांमध्ये महिलांचा वरचष्मा दिसून येत आहे.

तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ५९ गावांपैकी दुधाळवाडी, आडसूळवाडी, हळदगाव, लासरा, वाकडी (के) व भाटशिरपुरा या सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे १५ जानेवारी रोजी केवळ ५३ गावांमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

यामुळे निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या एकूण १८८ प्रभागांपैकी १६८ प्रभागांमध्ये निवडणूक होणार असून, निवडून द्यायच्या ४९५ सदस्यांची संख्याही आता ४०६ इतकी झाली आहे. तर एकूण ४३३ बुथवर ७७ हजार ७८० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

या निवडणुकीसाठी एकूण एक हजार १६ इतके विक्रमी उमेदवार निवडणुकीच्या फडात तंबू ठोकून तयार आहेत.

तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये इच्छुकांची मांदियाळी असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झालेली असताना तालुक्यातील गंभीरवाडी व भाटसांगवी या ग्रामपंचायतींच्या चार जागांवर मात्र कोणत्याही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत.

यामुळे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या भाटसांगवी येथील प्रभाग क्रमांक १ व ३ तर गंभीरवाडी येथील प्रभाग क्रमांक १ व २ मधील प्रत्येकी एक याप्रमाणे चार जागा रिक्त राहणार आहेत.

चौकट...

जागा आहे पण मतदार नाहीत

तालुक्यातील भाटसांगवी व गंभीरवाडी येथील ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी सातपैकी दोन जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. यापैकी भाटसांगवी गावात या प्रवर्गाचा एकही ग्रामस्थ नाही तर गंभीरवाडी येथे या प्रवर्गाचे एक कुंटुंब असले तरी त्यांनी नसती झंझट नको म्हणून यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. भाटसांगवी येथे यापूर्वीही अशीच स्थिती दिसून आली आहे.

५३ महिला बिनविरोध

तालुक्यातील शिंगोली, वाकडी, वडगाव (शि), मलकापूर, खोंदला, मंगरूळ, चोराखळी येथे प्रत्येकी एक तर सातेफळ, बारातेवाडी, बोरगाव (खु), उमरा येथे प्रत्येकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. याशिवाय बोरवंटी, कोठाळवाडी येथे तीन तर पाडोळी, वडगाव ज येथे चार तर सौदंणा, भोसा येथे प्रत्येकी पाच अशा १८ गावांमधील ४१ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यात महिला सदस्यांची संख्या ३० इतकी आहे. याशिवाय बिनविरोध झालेल्या सहा गावांमधील संख्या धरली तर एकूण ५३ जागी महिला बिनविरोध निवडून आल्याने त्यांचा वरचष्मा दिसून येत आहे. यातही ४१पैकी ३१ जागा आरक्षित प्रवर्गातील आहेत.

Web Title: Women's spectacles in unopposed seats