महिला काेरोना निगेटिव्ह असताना पॉझिटिव्ह दाखविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST2021-06-17T04:22:49+5:302021-06-17T04:22:49+5:30
उस्मानाबाद : जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असताना, महिलेवर इतर ठिकाणी उपचार घेण्याचा सल्ला देऊन ...

महिला काेरोना निगेटिव्ह असताना पॉझिटिव्ह दाखविले
उस्मानाबाद : जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असताना, महिलेवर इतर ठिकाणी उपचार घेण्याचा सल्ला देऊन महिलेची हेळसांड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन रुग्णांच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील शाहीन अझरोद्दीन पटेल १३ जूनला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी आल्या होत्या. यावेळी महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली. यात महिलेला कोरोना असल्याचे सांगितले. नातेवाइकांनी त्या महिलेची उस्मानाबाद येथीलच खासगी रुग्णालयात टेस्ट केली असता, यात महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. हा रिपोर्ट घेऊन नातेवाईक पुन्हा जिल्हा स्त्री रुग्णालयात गेले. त्या ठिकाणाहून त्यांना आयुर्वेदिक कोविड सेंटर येथे पाठविण्यात आले. परंतु, त्या ठिकाणी प्रसूतीवेळी जर सिझर करण्याची वेळ आली तर त्या ठिकाणी सिझर होत नसल्याचा सल्ला कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना दिला. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांनी पुढील उपचारांसाठी सोलापूरला घेऊन गेले. सोलापुरात आरटीपीसीआर व ॲँटिजेन टेस्ट केली. मात्र, दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले. रुग्ण हा जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत असून, आई व बाळ ठणठणीत आहे. घडलेला हा प्रकार जिल्हा स्त्री रुग्णालय हलगर्जीपणामुळे झाला असून, अशा चुकीच्या रिपोर्टमुळे नाहक एखाद्या रुग्णाच्या जिवावर बेतू शकतो ते नाकारता येत नाही. तरी संबंधित जे कोणी या प्रकरणांमध्ये चुकीची माहिती देऊन रुग्णांची हेळसांड केली आहे, त्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रुग्णाचे नातेवाईक रफिक पटेल यांनी १६ जूनला जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.