कुजबूज... कुजबूज...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:37 IST2021-09-12T04:37:11+5:302021-09-12T04:37:11+5:30
उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत एक सन्माननीय सदस्य नेहमीच अधिकाऱ्यांच्या रडारवर असतात. त्यांच्या बेसुऱ्या ‘गीतां’नी अधिकाऱ्यांची कानठळी बसते. काही दिवसांपूर्वीच एका ...

कुजबूज... कुजबूज...
उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत एक सन्माननीय सदस्य नेहमीच अधिकाऱ्यांच्या रडारवर असतात. त्यांच्या बेसुऱ्या ‘गीतां’नी अधिकाऱ्यांची कानठळी बसते. काही दिवसांपूर्वीच एका अधिकाऱ्यांपुढे त्यांनी गायलेली ‘आरती’ इतकी बेसुरी वाटली की, चक्क अधिकाऱ्यांनी आंदोलनही केले. तसेच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला, तारीखही दिली. पण पुढे बहुधा ‘सूर’ जुळले असावेत. दरम्यान, आता त्याच सदस्याने काहीच दिवसांपूर्वी ‘दादा’ अधिकाऱ्यासोबतच पंगा घेतला. पण या दादांनी आंदोलनाची उठाठेव केली नाही तर कारवाईबाबतचे एक निवेदन शांततेत दिले. आता पुन्हा पंगा झालाच तर प्रकरण वैयक्तिक पातळीवर सोडविण्याचा निर्णय या दादांनी घेतल्याची कुजबूज जिल्हा परिषदेत आहे.
दादा, तुम्हीच घ्या वं..!
तेरणा व तुळजाभवानी कारखान्यांचा पीएफ गुंता सुटला अन् इकडे जिल्हा बँकेचा जीव भांड्यात पडला. दोन्ही कारखाने भाडेतत्वावर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तेरणाची तर निविदाही निघाली आहे. मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना अशी ओळख असलेला हा कारखाना पदरी पाडून घेण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. बाहेरच्या काही कारखानदारांनी साईटवर चकराही सुरु केल्यात. पण इकडे अनेकांचे डोळे कारखानदारीतील ‘पॉवर’फुल दादांकडे लागून आहेत. पक्षाची विस्कटलेली ‘घडी’ पुन्हा बसविण्यासाठी कारखाना कामाचा आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी या दादांकडे ‘तेरणा चालवायला तुम्हीच घ्या वं...’ असा हट्ट धरल्याची कुजबूज आहे.