शिराढाेणमध्ये दाेनशेवर रुग्ण, काेविड सेंटर सुरू हाेणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:33 IST2021-05-10T04:33:12+5:302021-05-10T04:33:12+5:30
शिराढोण -कळंब तालुक्यातील शिराढाेण काेराेना हाॅटस्पाॅट बनले आहे. आजवर एकट्या शिराढाेणमधील रुग्णांची संख्या तब्बल दाेनशेवर जाऊन ठेपली आहे. काेराेनाचा ...

शिराढाेणमध्ये दाेनशेवर रुग्ण, काेविड सेंटर सुरू हाेणार कधी?
शिराढोण -कळंब तालुक्यातील शिराढाेण काेराेना हाॅटस्पाॅट बनले आहे. आजवर एकट्या शिराढाेणमधील रुग्णांची संख्या तब्बल दाेनशेवर जाऊन ठेपली आहे. काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन काेविड सेंटर सुरू करण्याची मागणी पुढे आली हाेती. त्यानुसार, कार्यवाही सुरू झाली हाेती. परंतु, आजवर सेंटर सुरू हाेऊ शकले नाही. त्यामुळे सेंटर सुरू हाेणार तरी कधी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.
कळंब तालुक्यातील शिराढाेण हे माेठी लाेकसंख्या असलेले गाव. येथील बाजारपेठही माेठी आहे. हे गाव सध्या काेराेना हाॅटस्पाॅट बनले आहे. दिवसागणिक बाधितांच्या संख्येत भर पडू लागली आहे. आजघडीला एकट्या शिराढाेणमधील बाधितांची संख्या २१० पेक्षा अधिक आहे. यापैकी अनेकजण उपचाराअंती बरे हाेऊन घरी गेले आहेत. दरम्यान, शिराढाेणसाेबतच आता आजूबाजूच्या गावांतही काेराेना विषाणूचा फैलाव हाेऊ लागला आहे. काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन शिराढाेण येथे काेविड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्याची मागणी पुढे आली हाेती. या अनुषंगाने पाेलीस ठाण्यात २५ एप्रिल राेजी ग्रामस्थांची बैठक झाली. बाधितांपैकी अनेकांना घरी विलगीकरणाची साेय नाही. त्यामुळे संबंधित रुग्णांचा इतरांशी संपर्क येत आहे. परिणामी, रुग्णसंख्येत झपाट्याने भर पडत आहे. प्रशासनाकडून विविध उपाययाेजना करण्यात येत आहेत. मात्र, काही केल्या रुग्णसंख्या आटाेक्यात येत नाही. त्यामुळे काेविड केअर सेंटर तातडीने सुरू करण्याच्या अनुषंगाने एकमुखी ठराव झाला. त्यानुसार, ग्रामपंचायतीने २६ एप्रिल रोजी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाठविला. दरम्यान, उपविभागीय अधिकारी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना जागा
पाहणी करण्याचे पत्र पाठविले होते. यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार यांनी जिल्हा परिषद शाळेच्या जागेची पाहणी केली. ही जागा सेंटरसाठी साेयीची असल्याने उपविभागीय अधिकारी यांनी सकारात्मक प्रस्ताव पाठविला. एवढेच नाही तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही शिराढाेणच्या नियाेजित सेंटरसाठी २५ बेड उपलब्ध करून दिले आहेत. असे असतानाही काेविड केअर सेंटर अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
बेड धूळखात पडून
शिराढोण कोरोना केअर सेंटरसाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी २७ एप्रिल रोजी २५ बेड देऊ केले आणि अवघ्या दाेन दिवसांत हे बेड गावात दाखल झाले. परंतु, काेविड केअर सेंटरच अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित बेड सध्या धूळखात पडून आहेत.
शिराढोणसह परिसरात काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. काही रुग्ण दगावलेही आहेत. असे असतानाही प्रशासनाकडून काेविड केअर सेंटर सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. ही बाब लक्षात घेऊन तरी सेंटर तातडीने सुरू करावे.
-किरण पाटील, सचिव, राणादादा प्रतिष्ठान
कोरोना केअर सेंटरसाठी नव्या प्रपत्रानुसार प्रस्ताव महसूल विभागाकडे मंजुरीसाठी पाठविलेला आहे. जिल्हा परिषद शाळेतील खोल्यांची व
परिसराची साफसफाई केली आहे. मंजुरी येताच सेंटर सुरू केले जाईल.
-डी.एफ. पुदाले, ग्रामविकास अधिकारी, शिराढोण
शिराढोण कोरोना केअर सेंटरचा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्रस्ताव आलेला नाही. तो प्रस्ताव मिळाल्यावर मंजुरीसाठी तत्काळ
वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल.
-आर.बी. शिंदे, तहसीलदार, कळंब