स्पाॅटवर टेस्ट सुरू करताना चाैकात थांबलेले टाेळके पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:33 IST2021-04-24T04:33:11+5:302021-04-24T04:33:11+5:30
कळंब : सकाळच्या वेळी चौकाचौकांत माणसांचे घोळके होते. विनाकारण थांबलेल्या या झुंडीतील ‘टोळक्यांना’ पकडून त्यांनी कोरोनाची ‘स्पॉट टेस्ट’ करण्यास ...

स्पाॅटवर टेस्ट सुरू करताना चाैकात थांबलेले टाेळके पसार
कळंब : सकाळच्या वेळी चौकाचौकांत माणसांचे घोळके होते. विनाकारण थांबलेल्या या झुंडीतील ‘टोळक्यांना’ पकडून त्यांनी कोरोनाची ‘स्पॉट टेस्ट’ करण्यास सुरुवात केली काय अन् अवघ्या दहा मिनिटांत चौक, पार, कट्टे सारं काही सुनसान झाले. रस्ते निर्मनुष्य झाले. हा प्रकार तालुक्यातील इटकूर येथे शुक्रवारी सकाळी अनुभयास मिळाला.
ग्रामीण भागात एकमेकांकडे काहीही काम नसताना काही वेळ सहवासात घालवायचा प्रघात असतो. यामुळे सकाळ, संध्याकाळ गावातील चौकात, पारावर, कट्यावर, बाजार मैदानात अशी टोळकी बसलेली असतात. आजवर हे ठीक होते; परंतु कोरोना काळातही यात खंड पडत नसल्याने साखळी ‘ब्रेक’ कशी होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता.
बाजारपेठेचं गाव असलेल्या तालुक्यातील इटकूर येथे ही अशीच स्थिती दिसून येत होती. बघता बघता रुग्णांचा आकडा वीसपर्यंत पोहोचला तरी घोळक्यांना अन् टोळक्यांना काही कमी नव्हते. याशिवाय चोरून हॉटेल चालविणे, मटका अन् गुटखा यामुळे लोक सातत्याने बाहेर राहत असल्याने संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला होता.
यावर ग्रामपंचायतीने संबंधितांना नोटिसा बजावूनही उपयोग होत नसल्याने शेवटी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने शुक्रवारी सकाळी सतत गर्दी होत असलेल्या बाजार मैदानात ‘ऑन दि स्पॉट’ कोरोना टेस्ट घेणारा कॅम्प राबविला. यावेळी उपसरपंच विलास गाडे, माजी पंचायत समिती उपसभापती तथा ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण आडसूळ, आबासाहेब आडसूळ, दत्ता बावळे, हनुमंत कस्पटे, तुकाराम शिंदे, शिवाजी आडसूळ, विजय माने उपस्थित होते.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैज्ञानिक अधिकारी महेश वेदपाठक, ग्रामपंचायतीचे लक्ष्मण गंभिरे, रोहित आडसूळ, गणेश माळी, कोतवाल सतीश राक्षे, उत्रेश्वर चाळक या कर्मचारी वर्गांनी मास्क न वापरणाऱ्या, अकारण भटकंती करणाऱ्या लोकांच्या रॅपिड ॲँटिजेन टेस्ट केल्या. यावेळी सर्व २० टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.
चौकट... © टोळक्यांना केला पोबारा, रस्ते झाले निर्मनुष्य...
इटकूर येथे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने संयुक्त मोहीम राबवीत ‘ऑन दि स्पॉट‘ कोरोना चाचणी करण्याची मोहीम चालू केल्यानंतर गावातील रस्ते, चौक, बाजार मैदान माणसांच्या गर्दीने फुलून गेलेले होते. परंतु, ग्रामपंचायतीच्या मोहिमेचा सुगावा लागताच बाहेर अकारण फिरत असलेल्या, बैठक मारलेल्या टोळक्यांनी आपला मोर्चा घराकडे वळविला. अवघ्या काही क्षणांत पार, कट्टा, चौक मोकळे झाले. रस्ते व बाजार मैदान निर्मनुष्य झाले.
© कळंबमध्ये ३६ पैकी ५ पॉझिटिव्ह...
कळंब शहरातील मोक्कार लोकांना जाग्यावर आणण्यासाठी महसूल, नप, आरोग्य व पोलीस या विभागाने संयुक्तरीत्या ‘स्पॉट टेस्ट’चा फंडा अवलंबला आहे. शुक्रवारी याच्या दुसऱ्या प्रयत्नात ३६ लोकांना पकडून त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात पाच व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, प्र. तहसीलदार अस्लम जमादार, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे स्वतः छत्रपती शिवाजी चौकात थांबून होते.