अतिवृष्टीने जिल्ह्यातील ४ लाख १ हजार शेतकऱ्यांच्या खरीप व फळपिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय ६ हजार ६९३ शेतकऱ्यांची शेतजमीन पुराच्या पाण्यात वाहून गेली. शेती खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती निवारण कोषातून हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये याप्रमाणे ११ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मागण्यात आला होता. ही संपूर्ण रक्कम शासनाने दिवाळीच्या दोन दिवस आधीच देऊ केली आहे.
दरम्यान, पिकांच्या नुकसानीपोटी २६७ कोटी ५७ लाख ६६ हजार रुपयांची मागणी होती. बहुवार्षिक पिकांसाठी शासनाने वाढीव मदत जाहीर करीत हेक्टरी १८ हजार रुपये तर कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी वाढीव मदत मिळून १० हजार रुपये मदतीची घोषणा केली. यातील १३३ कोटी ६५ लाख रुपये तातडीने दिलेही. मात्र, उर्वरित जवळपास १३४ कोटी रुपये अद्याप प्राप्त झालेले नाहीत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही मदत येण्याची चर्चा होती. मात्र, अजूनही ती आलेली नाही. दरम्यान, येत्या आठवडाभरातच हा निधी उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
येत्या काही दिवसांत मदतनिधी येऊ शकेल
अतिवृष्ष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात अर्धी मदत वाटप करण्यात आली आहे. उर्वरित दुसरा टप्पाही येत्या काही दिवसांत प्राप्त होण्याची शक्यता असून, लागलीच त्याचे वाटप करण्यात येईल.
- शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी