स्क्वॅश हॉलचे काम महिनाभरात पूर्ण करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:36 IST2021-09-21T04:36:47+5:302021-09-21T04:36:47+5:30
उस्मानाबाद : येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर स्क्वॅश रॅकेट्स हाॅलचे काम दर्जाहीन व निकृष्ट होत असल्याबाबत अनेक तक्रारी करूनही दखल ...

स्क्वॅश हॉलचे काम महिनाभरात पूर्ण करू
उस्मानाबाद : येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर स्क्वॅश रॅकेट्स हाॅलचे काम दर्जाहीन व निकृष्ट होत असल्याबाबत अनेक तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने जिल्हा स्क्वॅश संघटनेचे सहसचिव कुलदीप सावंत २० सप्टेंबरला एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी सदरील हॉलचे काम एक महिन्यात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
विविध पातळीवर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंसाठी अत्याधुनिक व दर्जेदार स्क्वॅश कोर्ट बनविण्याच्या दृष्टीने पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २३ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या बैठकीत नावीन्यपूर्ण योजनेतून स्क्वॅश हॉलच्या कामास मंजुरी देण्यात आली होती. तद्नंतर ९ महिन्यांनंतर २ जून २०२० रोजी १३ लक्ष ६७ हजार रुपये कामाची निविदा काढून सदरील काम ३ महिन्यांत पूर्ण करण्याच्या अटीवर संबंधित कंत्राटदारास कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. वास्तविक पाहता सदरील काम २ सप्टेंबर २०२० रोजी पूर्णत्वास येणे आवश्यक होते. परंतु कोविड १९ चे कारण दाखवत आजतागायत हे काम अपूर्ण आहे.
याबाबत जिल्हा संघटनेचे सहसचिव कुलदीप सावंत यांनी ३ वेळेस जिल्हाधिकारी व दिनांक १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री यांच्याकडे लेखी निवेदवनाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. यातच संबंधित विभागाकडून कसलेही गांभीर्य घेतले जात नसल्याने २० सप्टेंबरला एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे सावंत यांनी प्रशासनास पत्र दिले होते. दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे एक महिन्यासाठी उपोषण मागे घेत असून, दर्जाहीन काम झाल्यास अथवा काम अपूर्ण राहिल्यास पुन्हा उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल, असे कुलदीप सावंत यांनी सांगितले.