उमरगा : शहराला नगर पालिकेकडून सध्या सात-आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी येथील प्रकल्पावर ट्रान्स्फाॅर्मर जळाल्याने वीज पुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
शहराला माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प तसेच कोरेगाव येथील साठवण तलावातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत; परंतु शहराला लागणारे बहुतांश पाणी माकणी येथील निम्न तेरणा धरणातून उचलले जाते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाणी गळती, विद्युत पुरवठा नियमित नसल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. सध्या सात-आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, आठवड्यापूर्वी माकणी प्रकल्पातील जॅकवेलवरील ट्रान्स्फाॅर्मर जळाला असल्याने पाणीपुरवठा बंद आहे. विशेष म्हणजे, अजूनही या ठिकाणी नवीन ट्रान्स्फाॅर्मर बसविले गेले नसल्याने वीज कनेक्शनवरून कमी दाबाने वीज पुरवठा मिळत असून, यामुळे आवश्यकतेच्या तुलनेत निम्मा पाणी उपसा केला जात आहे.
शहराला दरदिवशी ३८ लाख लिटर पाण्याची गरज भासते. मात्र, विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने १५ लाख लिटर पाणी तेरणा प्रकल्पातून उपलब्ध होते. याशिवाय पाच ते सहा लाख लिटर पाणी कोरेगाव धरणातून घेतले जाते. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच माकणी प्रकल्पातून पाणीपुरवठा करणारे पाईप अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने ते सातत्याने फुटत आहेत. यातून अधूनमधून गळती होत असल्याने पाणीपुरवठ्यात सातत्याने खंड पडत असून, परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
माकणी व कोरेगाव हे प्रकल्प तुडुंब भरलेले असतानाही पालिकेच्या नियोजनाअभावी शहराला नियमित पाणीपुरवठा होत नाही. शहराची पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत असून, शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे नवीन नळकनेक्शन मागणीचे प्रस्तावही वाढत आहेत; परंतु पालिकेकडून वाढत्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून पाणीपुरवठ्याचे कोणतेही नियोजन नसून, उलट दैनंदिन नियमित पाणीपुरवठा करण्यातही अपयश येत असल्याचे दिसत आहे. तसेच गळतीवर कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी कोणतेही प्रयत्न होत नसून, लाखो रुपये खर्चूनही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप शहरवासीयांमधून केला जात आहे.
कोट.......
पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे सात-आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. याच पाण्यावर आम्ही अवलंबून असून, सात-आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे.
- सिद्धापा भोसले, नागरिक
सध्या नारंगवाडी उपकेंद्रावरून तेरणा धरणात पाणीपुरवठा करण्यात येतो. येथे विद्युत मोटारींना वीज कनेक्शन देण्यासाठी वेगळी वीज वाहिनी देण्यात आली आहे; परंतु या वाहिनीला ब्रेकर दिले नसल्याने वीज पुरवठा कमी-जास्त दाबाने होतो. त्यातच सध्या येथील ३३ केव्हीचे ट्रान्स्फाॅर्मर जळाल्याने आठवड्यापासून दुसऱ्या कनेक्शनवरून कमी प्रमाणात पाणी उपसा करीत आहोत; परंतु योग्य क्षमतेने पाणी उपसा करता येत नाही. त्यामुळे शहराला सात-आठ दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.
- रवींद्र सोनवणे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग