थकबाकी भरूनही पाणीपुरवठा सुरू होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:33 IST2021-04-22T04:33:46+5:302021-04-22T04:33:46+5:30

तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी आणि कसबे तडवळे या तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनांवरील वीजपुरवठा थकीत वीज बिलाचा ...

Water supply did not start even after payment of arrears | थकबाकी भरूनही पाणीपुरवठा सुरू होईना

थकबाकी भरूनही पाणीपुरवठा सुरू होईना

तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी आणि कसबे तडवळे या तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनांवरील वीजपुरवठा थकीत वीज बिलाचा भरणा न केल्याने खंडित करण्यात आला आहे. याची दखल घेत या तिन्ही ग्रामपंचायतींनी पंधरा दिवसांपूर्वी सात लाख रुपयांचा जीवन प्राधिकरण विभागाकडे भरणा केला; परंतु महावितरण व जीवन प्राधिकरणाच्या वेळखाऊ भूमिकेमुळे अद्यापही या गावांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी आणि कसबे तडवळे या तीन गावांना तेरणा मध्यम प्रकल्पातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. याच्या पाणीपट्टीची वसुली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होते. दरम्यान, वीज वितरण कंपनीची या पाणीपुरवठा योजनेवरील वीजपुरवठ्याची थकबाकी न भरल्याने १८ मार्च रोजी येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे या तिन्ही गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. याची दखल घेऊन तीन गावांतील ग्रामपंचायतींनी ८ एप्रिल रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सात लाख रुपये पाणीपट्टी भरणा केली. यानंतर १९ एप्रिल रोजी जीवन प्राधिकरणाने वीज वितरण कंपनीकडे ५ लाख ८ हजार रुपये जमा केले. मात्र, महावितरणने अद्यापही तोडलेला वीजपुरवठा पूर्ववत केला नाही. त्यामुळे या तिन्ही गावांतील ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती कायम आहे. विशेष म्हणजे, महावितरणने उर्वरित थकबाकी भरणा करण्याबाबतचे लेखी पत्रदेखील जीवन प्राधिकरणकडून घेतले असून, तरीही वीजपुरवठा सुरू न केल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे. याबाबत जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रमेश ढवळे यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.

कोट............

पाणीपट्टी थकबाकी भरून पंधरा दिवस उलटले तरी पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. याबाबत आम्ही रोज वीज वितरण कंपनीकडे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहोत; परंतु वीज कंपनी व जीवन प्राधिकरणच्या वेळखाऊ धोरणामुळे तीन गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

-नवनाथ नाईकवाडी, सरपंच, तेर

Web Title: Water supply did not start even after payment of arrears