अवकाशातून पडला वाशीत दगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:35 IST2021-09-25T04:35:27+5:302021-09-25T04:35:27+5:30
वाशी येथील शेतकरी प्रभू माळी हे शुक्रवारी सकाळी आपल्या शेतात भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. काढणीचे काम सुरू असतानाच अचानक ...

अवकाशातून पडला वाशीत दगड
वाशी येथील शेतकरी प्रभू माळी हे शुक्रवारी सकाळी आपल्या शेतात भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. काढणीचे काम सुरू असतानाच अचानक त्यांच्या समोर अंदाजे अडीच किलो वजनाचा लालसर रंगाचा दगड अवकाशातून आवाज करीत येऊन पडला़ अचानक दगड समोर पडल्याने ते घाबरून गेले. त्यांनी आजूबाजूला पाहिले असता जवळपास कोणीही नव्हते. माळी यांनी दगड निरखून पाहिले असता तो काहिसा वेगळा जाणवला. अशा प्रकारचा दगड त्यांनी पहिल्यांदाच पाहिला असल्याने त्याची माहिती त्यांनी तहसीलदार नरसिंग जाधव यांना दिली. यानंतर या दगडाचा पंचनामा तलाठ्याच्या मार्फत करण्यात आला. हा दगड अवकाशातून आला, असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. तो कोणत्या प्रकारचा आहे, याची माहिती जाणून घेण्यासाठी उस्मानाबाद येथील भूवैज्ञानिक कार्यालयास कळविले असून, परीक्षणानंतरच या दगडाविषयीची माहिती समजणार असल्याचे तहसीलदार नरसिंग जाधव म्हणाले.
यासंदर्भात उस्मानाबाद येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक बी.एम. ठाकूर यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, अवकाशातील आकाशगंगेतील उल्कापातानंतर ग्रहांचे तुकडे त्यांच्या कक्षेतून सुटून ते पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर ते जळलेल्या अवस्थेत येतात. तर काहींची राख होते. अशा प्रकारचे अपवादात्मक दगड पृथ्वीतलापर्यंत येत असतात. यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. या दगडाची तपासणी करण्यासाठी नागपूरच्या भारतीय भूवैज्ञानिक विभागाकडे पाठविण्यात येत असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.