बाणगंगा पुलावरील कठडे गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:29 IST2021-01-18T04:29:08+5:302021-01-18T04:29:08+5:30
भूम : खर्डा-पाथरुड रोडवरील बाणगंगा नदीवरील पुलाचे कठडे गायब झाल्याने, हा पूल अपघातास निमंत्रण बनला आहे. या पुलावरील ...

बाणगंगा पुलावरील कठडे गायब
भूम : खर्डा-पाथरुड रोडवरील बाणगंगा नदीवरील पुलाचे कठडे गायब झाल्याने, हा पूल अपघातास निमंत्रण बनला आहे. या पुलावरील संरक्षक कठडे तात्काळ बसवावेत, अशी मागणी वाहनधारकांनमधून होत आहे.
पाथरुड-खर्डा रोडवर भूम शहरापासून काही अंतरावर बाणगंगा नदीवर १९९२ साली हा मोठा पूल बांधलेला आहे. हा पूल अजूनही सुस्थितीत असून, केवळ दक्षिण बाजूचे कठडे तुटल्याने धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी मागील वर्षभरात अनेक अपघात झाले असून, एक ट्रॅक्टर नदीत कोसळल्याची घटनाही घडली होती. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
या रस्त्यावरून नगर, नाशिक, शिर्डीकडे जाणाऱ्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. विशेषत: कर्नाटक, आंध्र प्रदेशातून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. शिवाय, पुणे, नगर या भागात जाणाऱ्या वाहनांचीही रात्री जास्त वर्दळ असते. या रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रात्री आपरात्री खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात पुलावर आपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, शिवाय नदीवर पूल असल्याचे जवळ येईपर्यंत कळून येत नाही. त्यामुळे पुलाचे संरक्षक कठडे तत्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या संदर्भात येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, भूम, खर्डा, पाथरुड या रस्त्याचे नवीन काम लवकरच सुरू होणार आहे. त्याच वेळी या पुलावरील दोन्ही बाजूचे कठडेही नव्याने बसविले जाणार आहेत.