काेराेना लसीसाठी दाेन हजारावर लाेक ‘वेटींग’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST2021-05-07T04:34:33+5:302021-05-07T04:34:33+5:30

कळंब -कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी तालुक्यातील तब्बल दोन हजार जणांना प्रतीक्षा करावी लागत असून कोवॅक्सिन कधी येणार ...

Waiting for the Carnegie Vaccine | काेराेना लसीसाठी दाेन हजारावर लाेक ‘वेटींग’वर

काेराेना लसीसाठी दाेन हजारावर लाेक ‘वेटींग’वर

कळंब -कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी तालुक्यातील तब्बल दोन हजार जणांना प्रतीक्षा करावी लागत असून कोवॅक्सिन कधी येणार याचे उत्तर खुद्द आरोग्य विभागाकडेही नसल्याने या मंडळींची चिंता वाढली आहे.

कळंब उपजिल्हा रुग्णालयात १६ मार्चनंतर २५९७ जणांना कोवॅक्सिन लस दिली होती. यातील फक्त ३३४ जणांना या लसीचा दुसरा डोस मिळाला आहे- तर २२६३ जणांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. कळंब शहर व ग्रामीण भागात सध्या कोविशिल्ड लस उपलब्ध आहे. कोवॅक्सिन कधी उपलब्ध होणार याबाबत आरोग्य विभागाकडे कोणतीही माहिती नाही. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसाने दुसरा डोस घ्या असे सांगितले गेले होते. आता ६ ते ८ आठवड्यात दुसरा डोस घेतला तरी चालेल असे सांगितले जात आहे. आगामी १६ मे ला काही जणांचे पहिल्या डोसचे ८ आठवडे पूर्ण होत आहेत. त्यापूर्वी डोस नाही मिळाला तर काय? करायचे, असा प्रश्नही आता त्या मंडळीकडून उपस्थित केला जातो आहे. दरम्यान कोवॅक्सिनचा डोस जिल्हाभर कोठेच उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्यांची चिंता वाढली आहे. दुसरा डोस वेळेत नाही मिळाला तर काही पर्याय आहे काय? याबाबतही आरोग्य विभागाने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

चौकट -

डोसची मागणी नोंदविली -डॉ. मिटकरी

कोवॅक्सिन लसीचा सरकारकडून पुरवठा होत नाही. त्यामुळे त्याचे लसीकरण थांबले आहे. कोवॅक्सिन लसीची मागणी आम्ही शासनाकडे नोंदविली आहे. ती उपलब्ध होताच दुसरा डोस असणाऱ्यांना प्राधान्याने त्याचे लसीकरण केले जाईल. कोवॅक्सिन लस कधी उपलब्ध होईल याबाबत निश्चित सांगता येणार नाही, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी दिली.

चौकट

लसीकरण मोहिमेत सुसूत्रता आवश्यक - डॉ. रामकृष्ण लोंढे

राज्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. परंतु हळूहळू लाभार्थी वाढत आहेत. सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परंतु इतर लाभार्थ्यांचे काय? त्यांना लस केव्हा व कोठे मिळेल? काहींनी एक डोस घेतला आहे. काहींचा दुसरा घेणे बाकी आहे. काहींची दुसऱ्या डोसची मुदत संपत आली आहे. तसा त्यांचा धीर सुटू लागला आहे. याचे उत्तर प्रशासनाकडे नाही, अशी माहिती ‘आयएमए’चे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी दिली.

Web Title: Waiting for the Carnegie Vaccine