कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST2021-05-19T04:33:42+5:302021-05-19T04:33:42+5:30

कळंब : तालुक्यातील कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची प्रतीक्षा संपली असून, बुधवारी पाचशे जणांना हा डोस उपलब्ध करून दिला ...

The wait for a second dose of covacin is over | कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा संपली

कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा संपली

कळंब : तालुक्यातील कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची प्रतीक्षा संपली असून, बुधवारी पाचशे जणांना हा डोस उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्या लाभार्थ्यांची यादी आरोग्य विभागाने प्रसिद्ध केली आहे.

या यादीमध्ये नाव असलेल्या नागरिकांनी शहरातील विद्याभवन शाळेत बुधवारी सकाळी आठ वाजता जाऊन नोंदणी करून टोकन घ्यावे लागणार आहे. त्यावरील सूचनेनुसार डॉ. लोंढे यांच्या विजया हॉस्पिटल येथे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नोंदणीच्या वेळी समक्ष हजर असलेल्या व्यक्तीलाच टोकन देण्यात येईल. टोकन फक्त त्यावर नमूद तारखेपुरते मर्यादित असेल. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी शारीरिक अंतर ठेवणे, मास्क लावणे या नियमांचे काटेकोर पालन करावे. याचे पालन न केल्यास तसेच या ठिकाणी आरोग्य कर्मचारी यांच्याशी विनाकारण हुज्जत घालणे, धमकावणे अशा प्रकारे कोणाची वर्तणूक आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असेही उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, कळंब उपजिल्हा रुग्णालयातून कोव्हॅक्सिनची पहिली लस घेतलेले जवळपास अडीच हजार नागरिक आहेत. यापूर्वी ६६२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजे आणखी दीड हजाराच्या आसपास नागरिक वेटिंगवर आहेत. बुधवारी ५०० जणांनी दुसरा डोस घेतल्यानंतर उर्वरित हजारांना दुसरी लस कधी मिळणार, याचेही वेळापत्रक व यादी जाहीर करण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

चौकट -

सोमवारी फक्त ३२ जणांचे लसीकरण

सोमवारी कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर केवळ ३२ जणांचे लसीकरण झाले. या दिवशी लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने २८५ लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यास विविध प्रकारे प्रसिद्धी दिली. परंतु, सायंकाळी ५ वाजेपर्यंत फक्त ३२ लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात आला. हे प्रमाण केवळ १० टक्के आहे. प्रशासकीय पातळीवर कोविन ॲपवर केलेली नोंदणी कशी अपयशी ठरली, या यादीतील राहिलेले लाभार्थी कुठे गेले, असा प्रश्नही आता उपस्थित केला जातो आहे.

Web Title: The wait for a second dose of covacin is over