आदेशाचे उल्लंघन, एकास आर्थिक दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:10+5:302021-07-07T04:40:10+5:30
गुरे वाहून नेताना टेम्पो पकडला उस्मानाबाद : क्रूरतेने पशुधनाची वाहतूक करताना भूम पोलिसांनी एक टेम्पो पकडला आहे. शनिवारी मध्यरात्री ...

आदेशाचे उल्लंघन, एकास आर्थिक दंड
गुरे वाहून नेताना टेम्पो पकडला
उस्मानाबाद : क्रूरतेने पशुधनाची वाहतूक करताना भूम पोलिसांनी एक टेम्पो पकडला आहे. शनिवारी मध्यरात्री गस्त घालत असताना एक संशयास्पद टेम्पो पोलिसांनी आढळून आला. त्यांनी झडती घेतली असता आरोपी खलील रफिक कुरेशी व संतोष तरंगे (रा.पापनस, जि.सोलापूर) हे दोघे १४ पशुधनाची अन्न पाण्याची सोय न करता दाटीवाटीने अत्यंत क्रूरतेने त्यांची वाहतूक करताना आढळून आले. याप्रकरणी दोघांवर भूम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाण्याचा दर कमी केल्याने मारहाण
उस्मानाबाद : पाणी जारची किंमत केल्याने प्रतिस्पर्ध्याने एकास मारहाण केल्याची घटना उमरगा तालुक्यातील जगदाळवाडी येथे घडली आहे. गावातीलच आरोपी महेश चव्हाण, विष्णू चव्हाण, अनंत चव्हाण यांनी आकाश संजय भगत यास पाणी फिल्टरचा धंदा का चालू देत नाहीस, तू पाण्याचे भाव कमी का केले, असे विचारत काठीने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी आकाश भगत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रविवारी उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील कुरापत काढून मारहाण
उस्मानाबाद : मागील भांडणाची कुरापत काढून पळसप येथे मारहाणीची घटना घडली आहे. येथील मंगल रमेश कांबळे यांना आरोपी कुमार नवनाथ गायकवाड, प्रमोद नवनाथ गायकवाड (दोघेही रा. लातूर) व चंद्रसेन सुधान कांबळे यांनी कुरापत काढून काठीने मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यास गेलेल्या मंगल कांबळे यांच्या मुला-मुलींनाही आरोपींनी मारहाण केली. याप्रकरणी रविवारी ढोकी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकच्या धडकेत एकजण गंभीर जखमी
उस्मानाबाद : ट्रकने दिलेल्या धडकेत उस्मानाबादेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. ट्रकचालक मेहराज अब्दुल लतीफ याने त्यांच्या ताब्यातील ट्रक निष्काळजीपणे चालवून रविवारी दुपारी खाजानगर येथे राहणाऱ्या शकील जिकरे यांना धडक दिली. या घटनेत जिकरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांनी दिलेल्या जबाबानुसार शहर ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.