दुर्गंधीयुक्त पाण्याच्या कडेला बसून विकावा लागताेय भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST2021-09-18T04:35:37+5:302021-09-18T04:35:37+5:30
तुळजापूर : शहरातील जुन्या बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या भाजी मंडईत साेयी-सुविधांचा पत्ताच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना जागेअभावी ...

दुर्गंधीयुक्त पाण्याच्या कडेला बसून विकावा लागताेय भाजीपाला
तुळजापूर : शहरातील जुन्या बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या भाजी मंडईत साेयी-सुविधांचा पत्ताच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना जागेअभावी चक्क घाण पाण्याच्या कडेला बसून भाजीपाला विक्री करावा लागत आहे. याबाबत शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
तुळजापूर शहरातील जुन्या बसस्थानकाच्या पाठीमागील भाजी मंडईत शहरासह ग्रामीण भागातील नागरिक शेतकरी, व्यापारी भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी मोठी गर्दी करतात. मात्र ही भाजी मंडई विविध समस्यांनी ग्रासली आहे. नागरिकांना विशेषतः महिलांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. भाजी मंडईत मोठी समस्या म्हणजे भाजी विक्रेत्यांना ओट्याची सुविधा नाही. तसेच अंतर्गत रस्त्यांचाही पत्ता नाही. परिणामी पावसाळ्यात चिखलातूनच मार्ग काढत भाजीपाला खरेदी, विक्री करावा लागतो.
दरम्यान, भाजी मंडईत जागेअभावी शेतकरी मंडईच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याच्या कडेला बसूनच भाजीपाला विक्री करतात. भाजीपाला विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांसह इतर व्यावसायिकही टाकाऊ पदार्थ हे भाजी मंडईच्या लगतच टाकत असल्याने दुर्गंधीत जास्तीची भर पडत आहे. ही बाब पालिका प्रशासन गांभीर्याने घेणार कधी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.
चाैकट...
तुळजापूर शहरातील कचरा उचलण्याचा ठेका ज्या कंपनीला दिला आहे, त्या कंपनीच्या ठेकेदाराचा कामचुकारपणा तुळजापूरकरांच्या जिवावर उठला आहे. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. असे असताना देखील पालिका प्रशासन ठेकेदाराकडून तुळजापूर शहराची साफसफाई करून घेत नाही. दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. याची जबाबदारी तुळजापूर पालिका प्रशासन आणि ठेकेदारावर असून, पालिकेने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
प्रतिक्रिया..
भाजी मंडईमध्ये अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरली आहे. शहर स्वच्छतेसाठी कंत्राटी पद्धतीवर ठेका दिला असून त्याच्याकडूनही स्वच्छता केली जात नाही. तसेच जवळचे हॉटेल व्यावसायिक उरलेले शिळे अन्न येथे आणून टाकतात. त्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरत आहे. परिणामी नागरिकांसह भाजीपाला विक्रेत्यांचे आराेग्य धाेक्यात आहे.
- अविनाश पवार, सामाजिक कार्यकर्ते.
भाजी मंडईत कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. महिन्याला १५ लाख रुपयांचे बिल स्वच्छता विभागाकडून संबंधित ठेकेदार स्वच्छतेच्या नावाखाली उचलतो. मात्र स्वच्छता कुठेही केलेली दिसत नाही. त्या पैशाचा योग्य उपयोग होत नाही. कचरा विलगीकरण करून प्रक्रिया करण्याचे मुद्दे स्वच्छतेच्या टेंडरमध्ये असतानाही संबंधित एजन्सीने कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नाही.
- राहुल खपले, नगरसेवक, तुळजापूर.