लोकमत न्यूज नेटवर्क
वाशी : डेंग्यूसदृश्य तसेच चिकुनगुनियाच्या साथरोग आजाराने शहरवासीय सध्या त्रस्त आहेत. खासगी तसेच सरकारी रुग्णालयातही उपचारासाठी रुग्णांची मोठी गर्दी होत असून, प्रशासनाकडून मात्र उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शहरवासियांमधून केला जात आहे.
मागील वर्षीपासून नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत होती. आता कोरोनाचा संसर्ग ओसरत असताना साथरोगाने डोके वर काढले असून, चिकुनगुनिया बरोबरच डेंग्यूसदृश्य आजाराचे अनेक रूग्ण खासगी व शासकीय रूग्णालयात उपचारासाठी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. शहरातील खासगी डॉक्टरांच्या दवाखान्यात दररोज शंभर ते दीडशेच्यावर रूग्ण उपचारासाठी येत आहेत. विशेषत: शहरातील पाण्याची टाकी, शिवशक्ती नगर, झोपडपट्टी, शिवाजी नगर आदी भागात रूग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे. येथील ग्रामीण रूग्णालयात सध्या दररोज दीडशे ते दोनशे रूग्ण उपचारासाठी येत आहेत. येथील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असून, २५ हजार लोकसंख्या असलेल्या शहरासाठी एक किंवा दोन आरोग्य कर्मचारी पाठवून तालुका आरोग्य अधिकारी निश्चिंत असल्याचे दिसत आहे.
शहरात पूर्वी चार दिवसाला नळ योजनेव्दारे पाणी पुरवठा होत होता. मात्र, सध्या पावसाळा असताना शिवाय पाणी पुरवठा करणाऱ्या वंजारवाडी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असतानाही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी पुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे मिळेल त्या ठिकाणाहून पाणीसाठा करून नागरिक पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. नगर पंचायत प्रशासनाकडून काही भागात पाच ते सात तर काही भागात आठ ते दहा दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा होत असल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासोबतच शहरातील अनेक भागात घाणीचे साम्राज्यदेखील पसरले आहे. त्यामुळे नगर पंचायत तसेच आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी शहरवासियांमधून केली जात आहे.
कोट.......
शहराला नियमित पाणी पुरवठा होत आहे. साथरोग आजारांबाबत जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार, २२ ऑगस्टपासून लिक्वीड फवारणी केली असून, ती ९० टक्के पूर्ण झाली आहे. फॉगिंग मशीन सध्या नादुरूस्त असल्यामुळे भाडेतत्वावर मशीन मिळाल्यानंतर धूर फवारणी करण्यात येणार आहे.
- गिरीष पंडित, मुख्याधिकारी, नगर परिषद