रिक्त पदांमुळे पशुधनाची आरोग्य सेवा अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:20+5:302021-07-07T04:40:20+5:30
संतोष वीर भूम : येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात कर्मचारी कमतरतेमुळे पशुधनाच्या आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. शिवाय, कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर ...

रिक्त पदांमुळे पशुधनाची आरोग्य सेवा अडचणीत
संतोष वीर
भूम : येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात कर्मचारी कमतरतेमुळे पशुधनाच्या आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. शिवाय, कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण वाढत आहे. यामुळे रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी पशुपालकांमधून केली जात आहे.
२० व्या पशुगणनेनुसार भूम तालुक्यात ७६ हजार ५४८ गाय, १५ हजार १५६ म्हैस, ३३ हजार ४७ शेळ्या व मेंढ्या असे एकूण १ लाख २४ हजार ७५१ एवढे पशुधन आहे. भूम तालुका हा मागील काही काळापासून दूध उत्पादनात अग्रेसर आहे. याच काळात येथील दूध संघ देखील उत्पादनात एक नंबरवर होता. तालुक्यात पहिल्या पासूनच शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो. दुधावर आधारित खवा भट्ट्यांचा व्यवसायदेखील तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालतो. येथील खवा, पेढा राज्याच्या विविध भागांसह परराज्यातदेखील जातो; परंतु यासाठी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पशुधनासाठी आरोग्य सेवा मात्र रिक्त कर्मचाऱ्यांमुळे व्यवस्थित मिळत नसल्याचे दिसत आहे. एखादे पशुधन आजारी पडल्यानंतर त्याच्या उपचारासाठी पशुपालकांची मोठी दमछाक होत आहे.
वास्तविक भूम येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची सुसज्ज इमारत आहे; परंतु या इमारतीत काम करण्यासाठी कर्मचारी संख्या अपुरी आहे. सद्य:स्थितीत पशुसंवर्धन विभागात विविध संवर्गातील पशुधन विकास अधिकारी ४, वृणोपचारक ३ व परिचर ११ अशी एकूण १८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असून, याचा काहीअंशी परिणाम रुग्णसेवेवर देखील होत आहे. दुसरीकडे तालुक्यातील पशुधन संख्या पाहता सध्या २१ पशुवैधकीय दवाखान्यांची गरज आहे; परंतु तालुक्यात केवळ ११ दवाखाने व १ तालुका लघु पशुसर्व चिकित्सालय असे एकूण १२ रुग्णालये कार्यरत आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसायात अग्रेसर असलेल्या या तालुक्यात आजारी पशुधनाचे रोगनिदान, औषधोपचार, लसीकरण आणि विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करून पशुधनाचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने रिक्त पदे भरावीत, तसेच रुग्णालयांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.
चौकट.......
शस्त्रक्रिया करून ९७ पशुंचे प्राण वाचविले
पशुवैद्यकीय विभागात कर्मचारी संख्या अपुरी असली तरी यावरही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. कोरोना काळात या विभागाच्या वतीने तालुक्यात एकूण ११० पशुधनांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करून एकूण ९७ पशुधनाचे जीव वाचवण्यात यश मिळविले. यामुळे पशुपालकांचे जवळपास ५६ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान टळले आहे. शिवाय, वाचलेल्या या पशुधनापासून उत्पन्नदेखील सुरू आहे.
कोट.....
भूम तालुका हा संकरित गाईचा तालुका बनला आहे. हा तालुका दूध उत्पादनात तर अग्रेसर आहेच, शिवाय, तालुक्यातील खवा आणि पेढा महाराष्ट्र व शेजारच्या राज्यात देखील प्रसिद्ध आहे. यासाठी पशुपालकांनी आपले लाखमोलाचे पशुधन आजारीच पडू नये यासाठी त्यांच्या आरोग्य व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे. पशुधन आजारी पडल्यास तातडीने पशुवैद्यकाकडून रोगनिदान करून घ्यावे.
- डॉ. दत्तात्रय इंगोले, विस्तार अधिकारी, पशुवैद्यकीय विभाग.