धाराशिव : कर्नाटकातून दर्जाहीन व किडकी सुपारी घेऊन दिल्लीच्या दिशेने निघालेले ११ ट्रक शनिवारी रात्री पोलिसांच्या मदतीने अन्न प्रशासनाने फुलवाडी टोल नाक्यावरून ताब्यात घेतले आहेत. त्यातील साठ्याची पाहणी केली असता सुपारी मानकाप्रमाणे दिसून येत नसल्याने नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त प्रदीप कुटे यांनी दिली.
कर्नाटकच्या सुपारी बाजारातून दर्जाहीन व किडक्या सुपारी घेऊन ११ ट्रक दिल्लीकडे जात असल्याची माहिती पोलिस तसेच अन्न प्रशासनाला मिळाली होती. या अनुषंगाने सहायक आयुक्त प्रदीप कुटे यांनी कारवाईसाठी पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे विनंती केली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार व त्यांची टीम, नळदुर्ग पोलिसांच्या मदतीने शनिवारी रात्री सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील फुलवाडी टोल नाक्याजवळ सापळा रचण्यात आला. संशयित सर्वच ११ ट्रक एका मागोमाग जात असताना त्यांना रोखण्यात आले. यानंतर सहायक आयुक्त कुटे यांच्या सूचनेनुसार अन्न सुरक्षा अधिकारी वि. स. लोंढे, कनकावाड, तम्मडवाड, भिसे यांनी ट्रकमधील सुपारीच्या साठ्याची पाहणी केली असता ही सुपारी अतिशय सुमार दर्जाची व किडकी असल्याचे निदर्शनास आले. यानंतर २ कोटी ५९ लाख ५३ हजार २०० रुपयांची ही सुपारी व सर्व ट्रक ताब्यात घेण्यात आले. अन्न प्रशासनाने या सुपारीचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सहायक आयुक्त प्रदीप कुटे यांनी सांगितले.
गुटख्यासाठी होतो वापरअन्न प्रशासनाने ताब्यात घेतलेली किडकी सुपारी ही दिल्लीकडे निघाली होती. त्या भागात गुटखा निर्मितीचे बहुतांश कारखाने आहेत. गुटख्यासाठी अशा दर्जाहीन सुपारीचा वापर केला जात असल्याचा संशय प्रशासनाला आहे. नेमकी ही सुपारी कशासाठी वापरात आणली जाणार होती, याचे उत्तर पुढील तपासातूनच मिळू शकेल.