शेती पिकांना अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST2021-02-21T05:00:31+5:302021-02-21T05:00:31+5:30

गहू, ज्वारीची पिके आडवी : आंबे, द्राक्ष बागांनाही बसला फटका, शेतकरी पुन्हा संकटात उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील दोन दिवस ...

Untimely impact on agricultural crops | शेती पिकांना अवकाळीचा फटका

शेती पिकांना अवकाळीचा फटका

गहू, ज्वारीची पिके आडवी : आंबे, द्राक्ष बागांनाही बसला फटका, शेतकरी पुन्हा संकटात

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजाला पुन्हा मोठा फटका सहन करावा लागला. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक ठिकाणची ज्वारी, गहू ही पिके आडवी झाली. तसेच आंबा, द्राक्ष यासारख्या फळबागांना देखील मोठा फटका बसला. हरभऱ्याचेही मोठे नुकसान झाले. हे ढगाळ वातावरण असेच आणखी काही दिवस राहिल्यास द्राक्ष बागांवर रोगराईची भिती देखील बागायतदार शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

द्राक्ष गळू लागले

तुळजापूर : तुळजापूर शहरासह तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकळी पाऊस झाल्याने रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांमधील द्राक्षाची अद्याप निर्यात झाली नसतानाच अवकाळीच्या धुमाकुळानं द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शिवाय वाऱ्याने व पावसाने ज्वारीचे पीक आडवे झाले आहे. ढगाळ वातावरण असेच राहिले तर द्राक्ष बागांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. यंदा पाण्याची उपलब्धता सल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरासह आदी पिकांच्या पेरण्या केल्या. पेरणी नंतर पिके जोमाने उगविली आणि आता ती पिके काढणीला आली असतानाच अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह तडाखा दिल्याने ज्वारी, गहू आडवा झाला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. दरम्यान, या अवकाळी पावसाने द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले द्राक्ष फळ गळून पडू लागले आहेत. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष फळाच्या वजनात घट येण्याची भिती आहे. ढगाळ वातावरण असेच पुढे राहिले तर बागांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. गत वर्षी जोमाने आलेली द्राक्ष बाग लॉकडाऊनमुळे कवडीमोल भावाने विकावी लागली. यंदा अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे गहू, ज्वारी आडवी पडून त्यांचेही मोठे नुकसान झाले असल्याचे कामठा येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बळीराम साळुंके यांनी सांगितले.

हरभरा भिजला

येडशी : येडशीसह परिसरात गरुवारी रात्रीपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली होती. शुक्रवारी सकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने गहू, ज्वारी आडवी झाली. शिवाय, हरभरा पिक भिजून मोठे नुकसान झाले. यापूर्वी खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यावेळी बहुतेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा भरून आपली पिके संरक्षित केली होती. परंतु, ७२ तासात नुकसानीची माहिती दिली नसल्याने विमा कंपनी ने पीक विमा दिला नाही. त्यामुळे रबी हंगामात पीक विमा भरण्याकडे अनेक शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. मात्र, या वादळी वाऱ्याने बहुतांश शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आर्थिक गणित कोलमडले

उस्मानाबाद तालुक्यातील तेर व परिसरातील गावांमध्ये शुक्रवारी पहाटे वादळी वारे व विजांच्या कडकडाटा पाऊस झाला. यात काढणीला आलेल्या हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. शिवाय, उभी ज्वारी आडवी झाली असून, इतर पिकांनाही याचा फटका बसला. तोंडाशी आलेल्या पिकांना या पावसामुळे फटका बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

खळ्यात पाणी शिरले

कारी : आस्मानी संकटने बळीराजाची पुन्हा झोप उडाली. वर्षभर कष्ट करून वर्षाचे आर्थिक व आहाराचे नियोजन ज्या रबी हंगामावर अवलंबून असते त्याच हंगामात घेतल्या जाणाऱ्या ज्वारी, गहू, हरभरा या मुख्य पिकांवर आस्मानी संकटाने अचानक घाला घातला. कारी, कौडगाव, आबेजवळगे, भानसगावल गुंजेवाडी, घाटंग्री, सोनेगाव या भागातही वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले. अनेकांच्या मळणी केलेल्या खळ्यात पाणी शिरले. यात गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले. मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या द्राक्ष बागांना देखील फटका बसला. जसेजसे ऊन वाढत जाईल तसे मण्याला चिरा जाऊन प्रचंड नुकसान होते, असे द्राक्ष बागायतदार महेश डोके यांनी सांगितले. मोठ्या सुसाट असणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक बागेत घड पडले आहेत.

Web Title: Untimely impact on agricultural crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.