शिवाजी महाराज चौकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष; संतापलेल्या शिवप्रेमींनी पालिकेत टाकला कचरा
By सूरज पाचपिंडे | Updated: April 19, 2023 16:16 IST2023-04-19T16:16:04+5:302023-04-19T16:16:22+5:30
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातही कचऱ्याचे ढीग साचलेले होते.

शिवाजी महाराज चौकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष; संतापलेल्या शिवप्रेमींनी पालिकेत टाकला कचरा
धाराशिव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात कचरा उचलण्यास पालिकेकडून कुचराई केली जात असल्याचा आरोप करीत शहरातील शिवप्रेमींनी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील कचरा संकलित करून थेट नगर पालिकेच्या प्रांगणात टाकून अनोखे आंदोलन केले.
पालिकेत मागील वर्षभरापासून प्रशासकराज आहे. शहरातील विविध भागात स्वच्छतेकडेही दुर्लक्ष होत आहे. वर्दळीच्या ठिकाणी व रिकाम्या जागी कचऱ्यांचे ढीग साचलेले आढळून येतात. पालिका प्रशासनाकडून साफसफाईस विलंब होत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातही कचऱ्याचे ढीग साचलेले होते. तसेच नालेही तुंबलेले आहेत. या भागातही स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांतून वारंवार केली जात आहे; मात्र स्वच्छता केली जात नसल्याने संतापलेल्या शिवप्रेमींनी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कचरा वाहनात भरुन थेट पालिकेच्या प्रांगणात नेऊन ओतला. शहरातील साफसफाईकडे दुर्लक्ष केल्यास यापुढे ट्रॅक्टरने कचरा आणून टाकला जाईल, असा इशाराही पालिका प्रशासनास रणवीर इंगळे, सुधीर पवार यांनी दिला.