दहा कृषी सहाय्यकांवर बावीस गावांचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST2021-03-04T05:00:41+5:302021-03-04T05:00:41+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी मंडळ कृषी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकाऱ्याची बदली होऊन दोन वर्ष उलटले असून, अद्याप ...

दहा कृषी सहाय्यकांवर बावीस गावांचा भार
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी मंडळ कृषी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकाऱ्याची बदली होऊन दोन वर्ष उलटले असून, अद्याप ही जागा रिक्त आहे. त्यामुळे सध्या येथील कारभार प्रभारींवर सुरू असून, पर्यवेक्षकांच्या दोन जागा देखील रिक्त आहेत. शिवाय दोन कृषी सहाय्यक तालुका कार्यालयात काम करीत असल्यामुळे सध्या २२ गावांचा कारभार १० कृषी सहाय्यकांवर सुरू आहे.
दोन वर्षांपूर्वी येथील मंडळ कृषी अधिकारी आर. बी. जाधव यांची सोलापूर जिल्ह्यात बदली झाली. तेव्हापासून ही जागा रिक्त असून, सध्या येथील पदभार आनंद पाटील या कृषी सहाय्यकांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण सहन करीत कृषी खात्याच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या भागात बहुतांश शेतकरी द्राक्ष उत्पादन घेतात. यामुळे त्यांची सध्या द्राक्ष निर्यातीसाठी धावपळ सुरू असून, याकामी मार्गदर्शनाची गरज आहे. परंतु, कर्मचारी अभावी त्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळण्यात अडचणी येत आहेत.
तालुक्यातील द्राक्षाचे निम्मे क्षेत्र काटी मंडळात
तुळजापूर तालुक्यातील द्राक्षाच्या एकूण क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र काटी मंडळात आहे. सिंचनाचे क्षेत्रही वाढल्याने अनेक शेतकऱ्यांचा कल फळे, पालेभाज्या, फळभाज्या घेण्याकडे वाढला आहे. नवनवीन प्रयोग करून उत्पादने घेताना शेतकरी दिसतात. विशेषतः मांळुब्रा, वडगाव, जळकोटवाडी, सांगवी आदी गावच्या शिवारात द्राक्षासह अन्य पिकांचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रिक्त असलेले मंडळ अधिकाऱ्यांचे पद त्वरित भरावे, अशी मागणी होत आहे.
पाच मंडळ अधिकाऱ्याच्या जागा दीड वर्षापासून रिक्त
तुळजापूर तालुक्यात पाच मंडळ कृषी अधिकाऱ्यांसह कृषी पर्यवेक्षकांच्या आठ जागा मागील दीड वर्षांपासून रिक्त आहेत. नव्याने जागा भरल्या नसल्याने अतिरिक्त पदभार जोडलेल्या कर्मचाऱ्यांवर जादा कामाचा भार पडत आहे. कदाचित मे महिन्यात या रिक्त जागा भरून काढल्या जातील. यानंतर सर्व कारभार सुरळीत होईल, अशी माहिती एका प्रभारी मंडळ अधिकाऱ्याने दिली.