धूळखात पडलेल्या घंटागाड्या चालू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:35 IST2021-08-19T04:35:22+5:302021-08-19T04:35:22+5:30
वाशी : नगर पंचायतीने घनकचरा वाहतूक करणाऱ्या नवीन घंटागाड्या खरेदी केल्या. मात्र, मागील पाच महिन्यांपासून त्या धूळ खात पडून ...

धूळखात पडलेल्या घंटागाड्या चालू करा
वाशी : नगर पंचायतीने घनकचरा वाहतूक करणाऱ्या नवीन घंटागाड्या खरेदी केल्या. मात्र, मागील पाच महिन्यांपासून त्या धूळ खात पडून असून, त्या सुरू कराव्यात, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष भैय्यासाहेब वाघमारे यांनी केली आहे.
घंटागाड्या बंद ठेवल्यामुळे शहरातील विविध भागातील कचरा उचलण्याचे कामही ठप्प आहे. परिणामी संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या चिकुनगुनिया, थंडीताप अशा आजारांचे अनेक रुग्ण शहरात असून, खासगी दवाखान्यातील रुग्णांची संख्या वाढू लागलेली आहे. नगर पंचायतीने घनकचरा उचलण्यासाठी पाच घंटागाड्यांची खरेदी केली. आरटीओ कार्यालयाकडून याचे पासिंगही झाले. मात्र, अजूनही या गाड्या वापराअभावी धूळखात पडून आहेत. सध्या ज्या गाड्या चालू आहेत त्याही कधी येतात, याचा नागरिकांना पत्ता लागत नाही. त्यामुळे या घंटागाड्या सुरू करून कचरा उचलण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
चौकट.......
पाणी पुरवठ्याचेही नियोजन नाही...
नगर पंचायतीकडून शहरवासीयांना शुध्द व नियोजनबध्द पाणीपुरवठा होत नाही. सध्या आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचेही मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे. यावर भैय्यासाहेब वाघमारे यांच्यासह अमोल जानराव, सुशांत सुकाळे, किशोर गायकवाड, नितीन सुकाळे, महावीर सुकाळे, सुजित मस्के, संग्राम बनसोडे आदींच्या सह्या आहेत.