तुळजापूर रेल्वेप्रश्नी हक्कभंग आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:57 IST2021-03-13T04:57:37+5:302021-03-13T04:57:37+5:30
तुळजापूर : सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेप्रश्नी राज्य सरकार पूर्णत: उदासीन आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रश्नावर परिवहन मंत्र्यांनी चुकीची उत्तरे देऊन जनतेची ...

तुळजापूर रेल्वेप्रश्नी हक्कभंग आणणार
तुळजापूर : सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेप्रश्नी राज्य सरकार पूर्णत: उदासीन आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रश्नावर परिवहन मंत्र्यांनी चुकीची उत्तरे देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. याप्रकरणी आपण व आ. सुभाष देशमुख परिवहन मंत्रांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
आ. राणाजगजितसिंह पाटील यावेळी म्हणाले, चालू अर्थसंकल्पात केंद्र सरकारने तुळजापूर रेल्वे मार्गासाठी २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परंतु, राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात तुळजापूर रेल्वे मार्गासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आली नाही. याप्रश्नी आम्ही तारांकित प्रश्न विचारून अर्थसंकल्पात रेल्वेमार्गासाठी तरतूद का केली नाही, अशी विचारणा केली असता परिवहन मंत्री यांनी तुळजापूर रेल्वे मार्ग हा संपूर्णपणे केंद्र सरकारचा प्रकल्प असून, त्याचा सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात याची तरतूद केली नाही, असे चुकीचे उत्तर दिले. प्रधान सचिव यांनी २०१९ मध्येच तुळजापूर रेल्वे मार्गाच्या ८० किलोमीटर अंतरासाठी ९०५ कोटी रुपये खर्च असून, यातील निम्मा खर्च केंद्र सरकार व निम्मा खर्च राज्य सरकार करेल, असे पत्र राज्य सरकारला दिले होते. ते पत्र राज्य सरकारने स्वीकारलेही होते. असे असतानाही परिवहन मंत्र्यांनी या रेल्वे मार्गाप्रश्नी राज्याचा काही संबंध नाही असे चुकीचे उत्तर देऊन दिशाभूल केली आहे. याप्रश्नी आपण व आ. सुभाष देशमुख हक्कभंग प्रस्ताव आणणार आहोत, अशी माहिती पाटील यांनी दिली.
यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, रुग्णालय आरोग्य समिती सदस्य आनंद कंदले व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.