उस्मानाबाद : तेरणा तसेच तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्यांकडील थकीत कर्जामुळे जिल्हा बँक अडचणीत आहे. अडथळ्यांची शर्यत पार करीत बँकेने दाेन्ही कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार ‘तेरणा’ भाडेतत्त्वावर घेण्यासाठी डीडीएन एसएफए लि. मुंबई यांच्यासह तिघांनी तयारी दर्शवीत निविदा खरेदी केल्या आहेत.
जिल्ह्यातील ढाेकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना, तसेच श्री तुळजाभवानी साखर कारखान्यांना जिल्हा बँकेकडून काेट्यवधी रुपयांचे कर्ज देण्यात आले हाेते; परंतु दाेन्ही कारखान्यांनी वेळेत कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना आधार देणारी जिल्हा बँक अडचणीत आली. ठेवीदारांच्या ठेवी देणेही बँकेला कठीण झाले. त्यामुळे संबंधित दाेन्ही कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी बँकेकडून प्रयत्न सुरू करण्यात आले हाेते; परंतु त्यातही वेळाेवेळी अनंत अडथळे आले. या अडथळ्यांची शर्यत पार करीत अखेर बँकेने तेरणा साखर कारखान्याची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी न मेयर कमोडीटीज इ. प्रा. लि. मुंबई, २१ शुगर्स लि.मुंबई, डीडीएन एसएफए लि. मुंबई या तिघांनी निविदा खरेदी केल्या आहेत. निविदा प्रक्रियेसंदर्भात बुधवारी बैठक हाेणार आहे. निविदा प्रक्रियेचाच मुद्दा पुढे करीत विशेष बाब म्हणून ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळे तेरणा कारखाना चालविण्यासाठी काेणाला मिळणाार, याकडे परिसरातील शेतकरी, सभासद तसेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.