‘राकाॅं’ पदाधिकारी आत्महत्येप्रकरणी तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:36 IST2021-09-27T04:36:12+5:302021-09-27T04:36:12+5:30
लोहारा : लोहारा तालुक्यातील वडगाव (गां.) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस हणमंत दणाने (वय ३६) यांनी ...

‘राकाॅं’ पदाधिकारी आत्महत्येप्रकरणी तिघे अटकेत
लोहारा : लोहारा तालुक्यातील वडगाव (गां.) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस हणमंत दणाने (वय ३६) यांनी शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली हाेती. त्यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीवरून रविवारी पाहटे तिघांविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाेता. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना तातडीने अटक केली.
वडगाव (गां.) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस हणमंत दणाने (वय ३६) यांनी त्यांच्या वडगाव (गां.) येथील संपर्क कार्यालयातील छताच्या आडूला गळफास लावून अत्महत्या केली हाेती. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलीच तपास सुरू केला असता, दणाने यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीमध्ये तिघांची नावे हाेती. ‘‘पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून हाेत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूस जबाबदार असलेल्या या लाेकांची सखाेल चाैकशी करून कठाेर कारवाई करावी’’, असे चिठ्ठीत म्हटले हाेते. त्यानुसार पाेलिसांनी सुसाइड नाेट व मयताचे वडील प्रभाकर रामा दणाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मायादेवी दत्तात्रय गायकवाड, स्वाती दत्तात्रय गायकवाड व दत्तात्रय कचराप्पा गायकवाड (सर्व रा. वडगाव गां.) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लाेहारा ठाण्यात रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पाेलिसांनी तिघांनाही तातडीने अटक केली. प्रकरणाचा अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक आनंदराव वाठाेरे करीत आहेत.