काटेरी झुडपे काढली; वाहनधारकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST2021-07-12T04:20:53+5:302021-07-12T04:20:53+5:30
बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर ते रामपूर या चार किमी अंतरात रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढल्याने अपघाताचा धोका ...

काटेरी झुडपे काढली; वाहनधारकांना दिलासा
बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर ते रामपूर या चार किमी अंतरात रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर याची दखल घेत प्रशासनाने जेसीबीद्वारे ही झुडपे काढण्यास सुरूवात केली. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
उमरगा तालुक्यातील रामपूर ते पेठसांगवी या २३ किलोमीटर मार्गाचे दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे जवळचा मार्ग म्हणून या मार्गावर सतत मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. बलसूर ते रामपूर या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली असल्याने वाहन चालक, शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. काटेरी झुडपांमुळे अपघाताला निमंत्रणच मिळत असल्याचे स्थिती होती.
याबाबत शनिवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची तत्काळ दखल घेत प्रशासनाने बलसूर ते रामपूर या मार्गावरील धोकादायक काटेरी झुडपे काढण्यास सुरूवात केली. यामुळे वाहनधारक, शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.