अणदूर (जि. धाराशिव) : सोलापूर जिल्ह्यातील भाविकांसाठी देवदर्शनाचा पवित्र प्रवास एका क्षणात नियतीने हिरावून घेतला. सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ६५ वर अणदूरनजिक (ता. तुळजापूर) शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ३ महिला भाविकांना आपले प्राण गमवावे लागले, तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत.
कासेगाव उळे (जि. साेलापूर) येथील एक कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक अणदूर येथील खंडोबाच्या दर्शनासाठी क्रुझर जीपमधून (क्र. एमएच. २४- व्ही. ४९४८) निघाले होते. ही आनंदी यात्रा नॅशनल ढाब्याजवळ येताच काळाने घात केला. भरधाव असलेल्या जीपचा अचानक टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण पूर्णपणे सुटले. टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली जीप रस्त्यावरच भीषण पद्धतीने पलटी झाली. अपघात इतका भयानक होता की, प्रवासी रस्त्याच्या कडेला ३० ते ४० फूट दूर फेकले गेले.
या हृदयद्रावक दुर्घटनेत पूजा हरी शिंदे (३०), सोनाली माऊली कदम (२२), आणि साक्षी बडे (१९) या तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासह प्रवास करणारे ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी रुद्र हरी शिंदे (१२), आकाश दत्ता कदम (२५), हरी बाळकृष्ण शिंदे (३६), माऊली कदम (३०), अंजली रविंद्र आमराळे (१५), ओमकार हरी शिंदे (१०), श्लोक हरी शिंदे (०८), बालाजी पांडुरंग शिंदे (४७), शिवांश माऊली कदम (०१), कार्तिक रविंद्र आमराळे (१३), आणि कार्तिकी रविंद्र आमराळे (१५) यांचा समावेश आहे. गंभीर जखमी झालेल्या काही प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने, त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर किरकोळ जखमींवर नळदुर्ग येथील जिल्हा उप रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माणुसकीचे दर्शन...या संकटकाळात अणदूर येथील स्थानिक नागरिक देवदूतासारखे धावून आले. अपघातानंतर त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. नागरिकांनी एकत्र येऊन पलटी झालेली क्रुझर सरळ केली आणि जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोलाची मदत केली. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे अनेक जखमींना जीवदान मिळाले. नळदुर्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी या भीषण अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
Web Summary : A tire burst near Andur caused a fatal jeep accident, killing three women pilgrims from Solapur. Eleven others were severely injured and hospitalized. Locals assisted in rescue efforts. The accident occurred on the Solapur-Hyderabad highway.
Web Summary : अणदूर के पास टायर फटने से जीप दुर्घटना में सोलापुर की तीन महिला तीर्थयात्रियों की मौत हो गई। ग्यारह अन्य गंभीर रूप से घायल होकर अस्पताल में भर्ती हैं। स्थानीय लोगों ने बचाव प्रयासों में सहायता की। दुर्घटना सोलापुर-हैदराबाद राजमार्ग पर हुई।