उमरगा (जि. धाराशिव) : उमरगा - लातूर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून, सोमवारी सायंकाळी पीकअप व दुचाकीची जोरदार धडक बसल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास माडज पाटीजवळील अमराई समोर हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार औसा तालुक्यातील मंगळूर येथील दीपक वसंत रामपूरे (वय २७) व आकाश सूर्यकांत रामपुरे (वय २५) हे दोघे सख्खे चुलत भाऊ सोमवारी कामानिमित्त उमरगा शहरात आले होते. दरम्यान, काम आटोपून ते दुचाकीवरून (एम.एच. ५ ए.एन. ०५५४) ते गावाकडे परत जाताना माडज पाटीनजीक ट्रकने पिकअपला (एम.एच. २५ पी. ३४०८) ठोकरल्याने तो दुचाकीवर जावून धडकला. या अपघातामध्ये दीपक रामपुरे आणि आकाश रामपुरे या सख्या चुलत भावांसह पिकअपमध्ये चालकाच्या बाजुला बसलेले येळी (ता. उमरगा) येथील दिंगबर गिरजप्पा कांबळे (५७) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर पिकअप चालक संतोष स्वामी आणि मारुती रेड्डी (रा. दोघेही येळी, ता. उमरगा) हे जखमी झाले आहेत.
अपघात झाल्यानंतर तिघेही रस्त्यावर पडलेले हाेते. यावेळी महामार्गावरुन जाणारे एकही वाहन थांबत नव्हते. याचवेळी माडज येथील वैजिनाथ उर्फ नाना काळे यांनी पळसगांव (ता. उमरगा) येथील अजय कदम यांची उमरग्याकडे निघालेल्या पीक जीप थांबवली. या दोघांनी तिघांनाही प्रथम खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.