घरकुलाच्या दहा लाभाऱ्यांनी मांडले पंचायत समितीत ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:40+5:302021-06-18T04:23:40+5:30
कळंब -वेळेवर मस्टर न काढल्यामुळे घरकुलांच्या हक्काच्या रकमेला ‘टोपी’ लागत असल्याचा विषय सलग दुसऱ्या पं.स.मध्ये गाजला असून याची झळ ...

घरकुलाच्या दहा लाभाऱ्यांनी मांडले पंचायत समितीत ठाण
कळंब -वेळेवर मस्टर न काढल्यामुळे घरकुलांच्या हक्काच्या रकमेला ‘टोपी’ लागत असल्याचा विषय सलग दुसऱ्या पं.स.मध्ये गाजला असून याची झळ बसलेल्या शेळका धानोरा येथील दहा लाभार्थ्यांनी गुरुवारी दुपारी आपल्या व्यथा मांडण्यासाठी पंचायत समितीत ठाण मांडले होते.
कळंब तालुक्यात यंदा रमाई आवास योजने अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र असलेल्या दीड हजारावर व्यक्तींना घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. यानुसार प्रती लाभार्थी दीड लाख रूपयांचे अनुदान देत असलेल्या या योजनेची पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्याकरवी अंमलबजावणी केली जात आहे.
साधारणतः २६९ चौरस फुटाच्या बांधकामासाठी दिल्या जाणाऱ्या दीड लाखांपैकी १८ हजार रुपये नरेगातून मस्टर काढून अदा केले जातात. यासाठी थेट अनुदानाचा हप्ता झाल्यापासून २८ दिवसांच्या आत मस्टर काढणे क्रमप्राप्त आहे.
असे असताना ग्रापं व पंसच्या दुर्लक्षित कारभारात ही कालमर्यादा पाळली न गेल्याने अनेक गोरगरीब लाभार्थ्यांना हकनाक आपल्या हक्काच्या रकमेला मुकावे लागले आहे. यासंबंधी लोकमतने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर याचे, यादिवशी दुपारी झालेल्या पंसच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटले होते. यांनतर याची चौकशी करून तत्काळ अहवाल मागवण्यात येईल, असे गट विकास अधिकारी एन. पी. राजगुरू यांनी सांगितले होते.
चौकट...
शेळका धानोऱ्याच्या लाभार्थ्यानी 'पंस' गाठली
दरम्यान, लोकमतने लाभार्थ्यांची होणारी घुसमट समोर आणल्यानंतर गावोगावी यासंबंधी नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यातच गुरुवारी दुपारी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सागर बाराते यांच्या नेतृत्वाखाली शेळका धानोरा येथील दहा लाभार्थ्यांनी पंचायत समितीचे कार्यालय गाठत आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी गट विकास अधिकारी यांची भेट न होऊ शकल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
जानेवारीपासून चार नंबर देतोत तरी...
दरम्यान, बाबासाहेब शेवाळे, बाबासाहेब कसबे यासह दहा लाभार्थ्यांनी गट विकास अधिकाऱ्यांची भेट न झाल्याने उपसभापती गुणवंत पवार यांच्याकडे दाद मागितली. जानेवारीपासून चार नंबर दाखल करतात तरी रक्कम मिळत नसल्याचे सांगितले.