शिक्षणविरोधी धोरणामुळेच रोखले शिक्षकांचे पुरस्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST2021-09-05T04:36:56+5:302021-09-05T04:36:56+5:30

उस्मानाबाद : शाळा प्रवेशापासून निकालापर्यंतच्या प्रक्रियेत शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या ठाकरे सरकारने राष्ट्रीय शिक्षक दिनी शिक्षकांना पुरस्कार देण्याची प्रथा बंद ...

Teachers' awards stopped due to anti-education policy! | शिक्षणविरोधी धोरणामुळेच रोखले शिक्षकांचे पुरस्कार !

शिक्षणविरोधी धोरणामुळेच रोखले शिक्षकांचे पुरस्कार !

उस्मानाबाद : शाळा प्रवेशापासून निकालापर्यंतच्या प्रक्रियेत शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या ठाकरे सरकारने राष्ट्रीय शिक्षक दिनी शिक्षकांना पुरस्कार देण्याची प्रथा बंद करून शिक्षकांचीही उपेक्षा केली आहे. सलग दोन वर्षे राज्य शिक्षक पुरस्कार बंद करून शिक्षणाचे काटे उलटे फिरविण्याचा हट्ट मागे घेऊन शिक्षक पुरस्कारांची प्रथा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी शनिवारी केली.

राज्य शासनातर्फे राज्यातील शिक्षकांना ५ सप्टेंबरला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची प्रथा ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर कोणतेही कारण न देता बंद करण्यात आली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी राज्यातील शिक्षकांकडून आवेदनपत्रे मागवून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण सोहळे पार पाडणाऱ्या ठाकरे सरकारला राज्याचे पुरस्कार बंद करताना खंत वाटली नाही, असा आरोपही नितीन काळे यांनी केला. गेल्यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले गेले नाहीत, यावर्षी त्यासंबंधीचे कोणतेही परिपत्रकदेखील जारी केले नाही. शिक्षकांनी वारंवार मागणी करूनही सरकारतर्फे निवड समिती किंवा निवड प्रक्रियाही जाहीर करण्यात आली नाही. गेल्यावर्षी पुरस्कारांची निवड न केल्याने जे शिक्षक पुरस्कार व त्यापासूनच्या लाभापासून वंचित राहिले, त्यांची निवड करावी व यंदाचे पुरस्कार तातडीने जाहीर करून शिक्षण क्षेत्राचा अपमान थांबवावा, अशी मागणीही नितीन काळे यांनी केली.

पुरस्कार जाहीर न केल्याने पुरस्कार विजेत्या शिक्षकांना द्यावयाच्या दोन वेतनवाढींचा मुद्दाही सरकारने बासनात गुंडाळून ठेवला असून, कोणतेही कारण न देता शिक्षकांची उपेक्षा करणाऱ्या सरकारच्या शिक्षणविरोधी धोरणामुळे राज्याच्या शिक्षणक्षेत्राची स्थिती चिंताजनक बनली आहे, असा आरोप नितीन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

Web Title: Teachers' awards stopped due to anti-education policy!