सोशल मीडियामुळे तमाशा कलावंत दुर्लक्षित : मंगल बनसोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 06:51 PM2019-03-16T18:51:29+5:302019-03-16T18:54:26+5:30

खाजगी सावकारांच्या कर्जाचा वाढतोय बोझ...

Tamasha artists ignored due to social media: Mangal Bansode | सोशल मीडियामुळे तमाशा कलावंत दुर्लक्षित : मंगल बनसोडे

सोशल मीडियामुळे तमाशा कलावंत दुर्लक्षित : मंगल बनसोडे

googlenewsNext

- मारूती कदम

उमरगा (जि. उस्मानाबाद) : सोशल मीडियाचा वापर आणि वाढत्या महागाईने रसिक प्रेक्षकांमध्ये आलेली उदासिनता यामुळे मराठी माणसांचे प्रबोधन करणाऱ्या तमाशातील कलावंत आज दुर्लक्षित असल्याची खंत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कलावंत मंगल बनसोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. चारशे वर्षाची लोककलेची परंपरा जपण्यासाठी आपण गत ६५ वर्षापासून काम करीत असून, अखेरच्या श्वासापर्यंत ही कला वाढविण्याचे काम करणार असल्याचेही मंगल बनसोडे म्हणाल्या़

उमरगा तालुक्यातील कसगी येथे आयोजित यात्रा महोत्सवानिमित्त मंगल बनसोडे या दिडशे कलावंतांसह दाखल झाल्या आहेत़ भारतीय स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरचा तमाशा या लोककलेचा प्रवास त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना विषद केला़ भाऊ नारायणगावकर, विठाबाई नारायणगावकर या माझ्या आई-वडिलांमुळे मला तमाशा या लोककलेची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली़ तमाशा ही कला मराठी माणसांचे प्रबोधन करणारी जीवंत कला आहे़ पूर्वी बैलगाड्यांमधून आज या गावाला तर उद्या त्या गावाला असा तमाशा कलावंतांचा प्रवास असायचा़ पूर्वी तमाशा कलावंतांचा गावा-गावात मान-सन्मान केला जात असे़ कळानुरूप तमाशा कलावंतांना आपल्या कला प्रकारात आधुनिक बदल घडवावे लागले़ पूर्वीच्या तमाशात प्रेक्षकांतून प्रचंड मागणी असायची़ त्याकाळी नऊवारी साडीतील लावणीचा प्रेक्षकांकडून सन्मान होत असे़ वीस वर्षापूर्वी लावणी सादर करताना हुरूप यायचा़ हिंदी, मराठी चित्रपटाच्या मध्यंतरीच्या काळात लावणीला मानाचे स्थान मिळाले़ ढोलकी, डफ, तुणतुणे, कडकी, हलगी, ट्रानपेट या संगित साहित्याची जागा इलेक्ट्रॉनिक वाद्यांनी घेतली़ गावून नाचणं ही त्या काळातील कौशल्य पणाला लागायचं बदलत्या काळाप्रमाणे तमाशा कलावंतांना आपल्या कलेत बदल करावे लागले़ विष्णू बाळा पाटील, बापू बिरू वाटेगावकर, जहरी नाग, माहेरची साडी, राजीव गांधी हत्याकांड, इंदिरा ते जुन्या पुन्हा, भक्त प्रल्हाद, चिलिया बाळ, इथे नांदते मराठेशाही, जावळीत भडकला भगवा झेंडा, कलगीत युध्द गाथा, हर्षद मेहता, डाकू विरप्पन्न या सारख्या वग नाट्यांना रामचंद्र लक्ष्मण बनसोडे यांनी जन्म दिला़ तत्कालीन वगनाट्यामुळे जनतेचे प्रबोधन होत असे़ नऊवारीतील लावणीचा सन्मान होता़

साधारपणे आठ-दहा वर्षांत इंटरनेट, व्हाटस्अ‍ॅप, युट्यूब आदी सामाजिक माध्यमांचा तमाशा लोककलेवर परिणाम झाला आहे़ आलीकडच्या काळात तमाशाकडे अश्लिल नजरेने बघितले जात आहे़ प्रेक्षकांना बतावणी, गणगौळण, रंगबाजी, वगनाट्य या लोेककलांपेक्षा हिंदी, मराठी चित्रपटातील धांगडधिंगा असलेली गाणी आवडू लागली आहेत़ वाढती महागाई, सोशल मीडियाचा वाढलेला प्रभाव आणि रसिक श्रोत्यांनी फिरविलेली पाठ आदी कारणांमुळे तमाशा हा लोककला प्रकार आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़ महाराष्ट्रातील ५१ तमाशा फडापैैकी आता १० ते १५ तमाशा फड खाजगी सावकाराच्या कर्जाचे ओझे घेऊन चतकोर भाकरीच्या शोधात भटकंती करीत आहेत़ कलावंतांचा उदरनिर्वाह आणि खाजगी सावकाराच्या कर्जाऊ रक्कमेचे व्याज एवढ्या पुरताच तमाशा कलावंत आता उरल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

पण भाकरीचे काय
तमाशा करीतच आई विठाबाई यांनी मला पोटात नऊ महिने नऊ दिवस वाढविले़ त्यांच्या पदराला धरूनच तमाशाच्या रंगमंचावर आले़ आयुष्यात कधीच शाळेचा रस्ता दिसला नाही़ मुलगा नितीन बनसोडे आता माझ्या रंगमंचावरचा नायक असून, आम्ही मायलेकरे तमाशा कलेसाठी नायक-नायिकेची भूमिका करीत आहोत़ अनिल बनसोडे आणि नितीन बनसोडे या दोघा मुलांनी ही कला जिवंत ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे़  पुरस्कार कितीही मिळाले तरी रोजच्या भाकरीचे काय? असा सवाल कलावंतांना नेहमी सतावतो, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली.

तमाशा कलेला राजाश्रय मिळावा...
तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे़ या कलेवर आज हजारो कलावंताचा उदरनिर्वाह अवलंबून आहे़ तमाशा कलावंतांकडे इतर उद्योग, व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पाठबळ नसल्यामुळे या कलेशिवाय त्यांना जगणे कठीण आहे़ या लोक प्रबोधनाच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने कलावंतांच्या मानधनात वाढ करण्याची गरज आहे़ डिझेलच्या दरात सवलत देण्यासह तमाशा सादरीकरणाची वेळ वाढवून देण्याची गरज असून, तमाशा कलेला शासनाने राजाश्रय द्यावा, असे मंगल बनसोडे यांनी व्यक्त केले.

Web Title: Tamasha artists ignored due to social media: Mangal Bansode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.