तडवळ्याच्या हुरड्याला मिळाली सोशल मीडियाची बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 07:43 PM2018-03-14T19:43:06+5:302018-03-14T19:44:38+5:30

तरुण शेतकर्‍यांनी हुरड्याची सोशल मीडियावर अचाट मार्केटिंग करुन थोडथोडके नव्हे शेतमालाला चार ते पाचपट अधिक भाव मिळवून घेतला़

Tadwala Hurda got tremendous Market by Social Media | तडवळ्याच्या हुरड्याला मिळाली सोशल मीडियाची बाजारपेठ

तडवळ्याच्या हुरड्याला मिळाली सोशल मीडियाची बाजारपेठ

googlenewsNext

उस्मानाबाद : शेतीतील तंत्रज्ञानाचा वापर हा शेतमाल उत्पन्नवृद्धीसाठी पूरक मानला जात होता़ मात्र, शेतकरी तंत्रनाज्ञाचा वापर करुन पदरी पडलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळवून घेऊ शकतात, हे सिद्ध केलंय कसबे तडवळ्याच्या कल्पक तरुणांनी. येथील तरुण शेतकर्‍यांनी हुरड्याची सोशल मीडियावर अचाट मार्केटिंग करुन थोडथोडके नव्हे शेतमालाला चार ते पाचपट अधिक भाव मिळवून घेतला़

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथील तरुण शेतकरी महेश जमाले व त्यांच्या इतर दहाएक सहकार्‍यांनी सेंद्रीय शेतीला सुरुवात केली आहे़ याअंतर्गत त्यांनी २० गुंठे जमिनीवर हुरड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ज्वारीची लागवड केली होती़ यादरम्यान, त्यांनी ‘ओन्ली आॅरगॅनिक’ नावाचा एक व्हाट्सअप ग्रुपही तयार केला़ या ग्रुपच्या माध्यमातून सेंद्रीय शेती व उत्पादनाविषयीच्या माहितीचे आदान-प्रदान सुरु होते़ इकडे ज्वारीच्या लागवडीला ४ महिने पूर्ण होत आले होते़ ज्वारी हुरड्यात आली होती़ ती वाळून ज्वारीचे उत्पादन घ्यावे तर बाजारपेठेत पुरेसा भाव दिसत नव्हता़ त्यामुळे या युवकांनी हुरडाच विकायचा निर्धार केला़ मग त्यांनी व्हॉट्स ग्रुपवर आपापल्या  ओळखीचे व महानगरांमध्ये राहणार्‍या नागरिकांचे क्रमांक मिळवून आपल्या गुपला जोडले़ या ग्रुपच्या माध्यमातून मग त्यांनी सेंद्रीय हुरड्याची मार्केटिंग सुरु केली़ त्यासाठी काही व्हीडिओही बनविले़ हे व्हीडिओ व इतर माहिती प्रसारित करुन हुरड्याची चांगलीच मागणी त्यांनी मिळविली़ अगदी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद शहरांपर्यंत त्यांनी आपले मार्केट बसविले़ आपल्या संपूर्ण ज्वारीचा वापर महानगरांतील हुरडा पार्ट्यांसाठी करुन या युवकांनी २० गुंठ्यातच प्रत्येकी सरासरी ४० ते ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे़ 

हुरड्यातही त्यांनी ग्राहकांपुढे दोन पर्याय दिले होते़ तयार हुरडा जास्त काळ टिकणार नाही, याची माहिती देवून तो दीर्घकाळासाठी वापरायचा असेल तर थेट ज्वारीची कणसे पाठविण्याचीही सोय करुन दिली़ त्यापासून हवा तेव्हा हुरडा कसा तयार करायचा याबाबतची माहिती नागरिकांना दिली़ त्यामुळे प्रचंड मागणी आली व उत्पन्नही चांगले मिळाल्याचे महेश जमाले म्हणाले़ आपल्या कल्पकतेची तंत्रज्ञानाशी सांगड घालून तडवळ्यातील या युवकांनी घसघशीत उत्पन्न पदरी पाडून घेतले आहे़

असा झाला फायदा
साधारणत: ज्वारी येण्यासाठी ५ ते ६ महिने कालावधी थांबावे लागते़ त्यातही सध्याचा भाव लक्षात घेता २० गुंठ्यातून फारतर १० हजार रुपयांची ज्वारी झाली असती़ मात्र, हुरड्यामुळे सरासरी ४० हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे़ शिवाय, दीड-दोन महिने आधीच रान इतर पिकासाठी मोकळे झाले, हा फायदा वेगळाच !

Web Title: Tadwala Hurda got tremendous Market by Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.