पुराच्या पाण्याचा सांगवीला वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST2021-09-27T04:35:23+5:302021-09-27T04:35:23+5:30
पंधरा तास तुटला गावाचा संपर्क : तामलवाडी परिसरात तुडुंब तामलवाडी : शनिवारी झालेल्या जोरदार पावसाने तामलवाडी भागातील तलाव तुडुंब ...

पुराच्या पाण्याचा सांगवीला वेढा
पंधरा तास तुटला गावाचा संपर्क : तामलवाडी परिसरात तुडुंब
तामलवाडी : शनिवारी झालेल्या जोरदार पावसाने तामलवाडी भागातील तलाव तुडुंब भरून वाहू लागले आहेत. सांगवी-मांळुब्रा तलाव सांडव्याद्वारे भरून वाहू लागला असून, पुराच्या पाण्याने सांगवी गावाला वेढा घातला आहे. यामुळे तब्बल १५ तास गावाचा संपर्क तुटला होता. रविवारी दुपारनंतर पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने गावकऱ्यांना गावाबाहेर पडता आले.
गुरुवारी रात्रीनंतर शनिवारीही सावरगाव महसूल मंडळाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. सावरगाव मंडळात ५९ मिमी, तर मंगरूळ मंडळात ४६ मिमी पावसाची नोंद झाली. शनिवारी रात्री झालेल्या पावसाने सांगवी गावानजीकचा पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली जाऊन पुराच्या पाण्याने सांगवी गावास वेढा दिला. यामुळे १५ तास गावकऱ्यांना गावाबाहेर पडता आले नाही. तीन दिवसांत दोन वेळा पूल पाण्याखाली जाण्याची घटना घडली. सुरत गाव येथेही झोपडपट्टीकडे जाणाऱ्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद होती. सुरतगाव ओढ्यानजीक असणारी रोपवाटिका पुरात वाहून गेली, तर येथील अण्णा गुंड यांच्यासह अन्य एकाच्या घराची भिंत पावसाने कोसळली आहे. या पावसाचा सोयाबीन पिकालादेखील मोठा फटका बसण्याची शक्यता असून, यामुळे बळीराजा काळजीत आहे. दरम्यान, तामलवाडी गावानजीक पुराचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरल्याने तारांबळ उडाली.
चौकट
सहा तलाव ‘ओव्हर फ्लो’
तामलवाडी भागातील सांगवी, मांळुब्रा, तामलवाडी, धोत्री, सावरगाव, काटी-दहीवडी आदी साठवण तलाव पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले आहेत. रविवारी दिवसभर ओढ्याला पूर कायम होता.