साखर, तेल महागल्याने मिठाईचे दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST2021-09-16T04:40:14+5:302021-09-16T04:40:14+5:30
उस्मानाबाद : मागील काही दिवसात साखर, डाळी, सिलिंडर गॅस, खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने मिठाईच मिठाईच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ...

साखर, तेल महागल्याने मिठाईचे दर वाढले
उस्मानाबाद : मागील काही दिवसात साखर, डाळी, सिलिंडर गॅस, खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने मिठाईच मिठाईच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सणासुदीत गोडवा कमी झाल्याचे चित्र आहे. मिठाईच्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. या कालावधीत जीवनाश्यक वस्तूंचे दरही सातत्याने वाढत आहेत. तेलाचे दर १५० रुपये किलोच्या पुढे सरकले आहेत. त्याचबरोबर डाळीही महागल्या आहेत. सिलिंडरच्या गॅसच्या दरातही सातत्याने वाढ होत चालली आहे. साखर ३२ रुपयांवरुन ३६ रुपये किलो झाली आहे. सणासुदीच्या दिवसात दुधाचे दर जैसे थे आहेत. मात्र, अन्य साहित्य महागल्याने मिठाईचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्याची झळ ग्राहकांच्या खिशाला बसत आहे.
का वाढले दर?
दूधाचे दर 'जैसे थे' असले तरी तेल, साखरेचे दर वाढले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या दरात मिठाई तयार करुन विकणे अशक्य झाले आहे. त्यात ग्राहकांची संख्याही घटल्याने नाईलास्तव दरवाढ करावी लागली.
विक्रम गेहलोत, स्वीट मार्ट चालक
कोरोना काळात आमचे मोठे नुकसान झाले. मागील काही महिन्यांपासून तेलाचे दर वाढले आहेत. साखरही महागली आहे. त्यामुळे दुधाचे दर स्थिर असले तरी पूर्वीच्या दरात मिठाई विकणे परवडणारे नाही.
नरसिंग राजपूत, स्वीट मार्ट चालक
दरावर नियंत्रण कोणाचे
उपहार गृह, हॉटेल किंवा स्वीट मार्टमध्ये विकल्या जाणाऱ्या पदार्थाची गुणवत्ता दर्जा आदीबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जाते. मात्र, याच हॉटेल, स्वीटमार्टमध्ये दर विक्रेते स्वत: निर्धारीत करतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात कुठलीच यंत्रणा नाही.
भेसळीकडे लक्ष असू द्या
स्वीटमार्ट, हॉटेलात मिठाईपासून जे दूधाचे पदार्थ बनवितात त्यामध्ये मैदाची भेसळ होण्याची शक्यता असते. यातून एखादवेळी मिठाई खाणाऱ्याचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे मिठाई खरेदी करताना प्रत्येकाने ती पारखूनच खरेदी केली पाहिजे.
ग्राहक म्हणतात
कोरोना काळात सर्व चित्र पालटत आहे. जीवनाश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. खाद्यतेल, साखर, डाळ महागली आहे. त्यामुळे मिठाईच्या किमती वाढल्या आहेत. त्याची खिशाला झळ बसत आहे. शासनाने महागाईवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
अनिल कांबळे, ग्राहक
सद्यस्थितीत गणेशोत्सव सण साजरा होत आहे. या काळात आरतीनंतर प्रसाद म्हणून मिठाई दिली जाते. त्यामुळे मोदक, पेढा, मोतीचूर लाडू, बेसन लाडू या मिठाईला ग्राहक पसंती देतात. मात्र, या सर्वच मिठाईचे दर दोन महिन्यांपासून वाढले आहेत. खरेदी करतानाच खिसा पाहूनच खरेदी करावी लागत आहे.
तानाजी भोसले, ग्राहक