सुभाष सासणे यांच्या विश्वविक्रमाकडे जिल्ह्याच्या नजरा !

By Admin | Updated: December 1, 2014 00:49 IST2014-12-01T00:45:56+5:302014-12-01T00:49:41+5:30

उस्मानाबाद : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासणे यांना बालपणापासूनच व्यायामाची आवड होती. ही आवड त्यांनी शालेय, महाविद्यालयीन आणि सैनिकी सेवेत अधिकारी पदावर

Subhash Sasane's world records, eyes of the district! | सुभाष सासणे यांच्या विश्वविक्रमाकडे जिल्ह्याच्या नजरा !

सुभाष सासणे यांच्या विश्वविक्रमाकडे जिल्ह्याच्या नजरा !



उस्मानाबाद : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासणे यांना बालपणापासूनच व्यायामाची आवड होती. ही आवड त्यांनी शालेय, महाविद्यालयीन आणि सैनिकी सेवेत अधिकारी पदावर रुजू झाल्यानंतरही कायम जोपासली. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या या आवडीला अधिक बळकटी मिळत गेली. ४२ व्या वर्षीही ते सकाळी दोन तास आणि सायंकाळी तीन तास असा पाच तास नियमित व्यायाम करतात. तसेच आहारामध्ये ते दीड ते दोन लिटर दूध घेतात. बेचाळीसीतील सासणे यांचा सोमवारी सकाळी ८ वाजता स्टेप अप्स आणि पुश अप्सचा विश्वविक्रमाचा कार्यक्रम येथील जिल्हा क्रीडा मैदानावर होत आहे. याकडे अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सासणे म्हणाले की, माझे मूळ गाव कोल्हापूर. १९९७ मध्ये लष्कर सेवेत अधिकारी म्हणून दाखल झाल्यानंतर जवळपास २० वर्षसेवा केली. सेवेत असतानाच म्हणजे सन २००० मध्ये लातूर येथे २४ तास स्टेप अप्सचा विक्रम केला आहे. दीड वर्षापूर्वी येथे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून मी रुजू झालो. त्याचवेळी स्टेप अप्स आणि पुश अप्स क्रीडा प्रकारातील विश्वविक्रम करण्यासाठी तयारीला लागण्याचा निश्चय केला. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी कुठल्याही बाबीचा विचार न करता नित्यनियमाने सराव करत राहिलो. सकाळी ५.३० वाजता उठून योगासने आणि त्यानंतर नियमित व्यायाम करतो. यासाठी किमान दोन तास देतो. त्यानंतर दिवसभराचे कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळी तीन ते साडेतीन तास व्यायाम करतो. या दिनचर्येमध्ये कधीही खंड पडू दिला नाही. मग उन्हाळा असो अथवा हिवाळा, पावसाळा. त्यामुळेच अवघ्या दीड वर्षाच्या काळात विश्वविक्रम करण्यासाठी लागणारी कुवत निर्माण होवू शकली, असेही ते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दूध हा अविभाज्य घटक आहे. मी प्रतिदिन किमान एक ते दीड लिटर दूध आहारामध्ये घेतो. आजच्या युवा पिढीने अशा क्रीडा प्रकारांकडे वळण्याची गरजही सासणे यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, सासणे यांच्या सोमवारच्या विश्वविक्रमाकडे अख्ख्या जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. (प्रतिनिधी)४
अगदी लहानपणापासूनच मला शारिरीक कसरतीचा लळा होता. तो कायम जपत आलो आहे. दहावीपर्यंतचे शिक्षण पन्हाळा येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथे झाले. १९९६ साली पदवीधर झाल्यानंतर सैन्य दलातील अधिकारी पदासाठी परीक्षा दिली. १९९७ मध्ये आर्मी फिजीकल ट्रेनिंग कोअरमध्ये सैन्य अधिकारी म्हणून काम पाहिले. मात्र कधीही व्यायामाकडे दुर्लक्ष केले नाही, असेही सासणे यांनी सांगितले.४
स्टेप अप्स आणि पुश अप्सच्या विश्वविक्रमासाठी किमान चार ते पाच लाख रुपये इतका खर्च येत आहे. हा सर्व खर्च स्वत: करीत असल्याचे मेजर सासणे यांनी सांगितले.
४यापूर्वी स्टेप अप्स आणि पुल अप्स हे विक्रम अमेरिका, ब्रिटन आणि जर्मन या देशांतील क्रीडापटुंच्या नावावर नोंदविले गेले आहेत. आता हा विश्वविक्रम मी करणार असल्याचेही मेजर सासणे यांनी सांगितले.
विश्वविक्रमाचा हा कार्यक्रम पुणे येथे घेणार होते. परंतु, जिल्हा सैनिकी कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असताना उस्मानाबादकरांकडून मिळालेला जिव्हाळा आणि प्रेमापोटी येथे कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला, असे सुभाष सासणे यांनी सांगितले. सदरील विश्वविक्रमासाठी सकाळी ८ वाजता येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रिडा स्टेडिअमवर प्रारंभ होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अनेकांची उपस्थिती रहाणार आहे.

Web Title: Subhash Sasane's world records, eyes of the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.