कोटीच्या घरात खर्च केलेले क्रीडा संकुल उद्घाटनाआधीच झाले खंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST2021-03-07T04:29:28+5:302021-03-07T04:29:28+5:30
उन्मेष पाटील कळंब : ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे मैदान असावे, त्यांच्यातील खिलाडूवृत्ती विकसित व्हावी व सर्वच क्रीडाप्रकार एकाच मैदानात ...

कोटीच्या घरात खर्च केलेले क्रीडा संकुल उद्घाटनाआधीच झाले खंडर
उन्मेष पाटील
कळंब : ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे मैदान असावे, त्यांच्यातील खिलाडूवृत्ती विकसित व्हावी व सर्वच क्रीडाप्रकार एकाच मैदानात खेळता यावेत यासाठी शासनाने कोटीच्या घरात खर्च करून बांधलेले क्रीडा संकुल आता भग्नावस्थेत गेले आहे. नको नको ते खेळ आता या संकुल परिसरात होत असल्याने याचसाठी केला होता का अट्टाहास? असा प्रश्न खेळाडूंमधून विचारला जात आहे.
खेळाची मैदाने त्या गावच्या माणसांचे आरोग्य सांगतात, असे म्हटले जाते. कळंबच्या ऐन मध्यभागी शासनाच्या क्रीडा विभागाने कोटीच्या घरात खर्च करून इनडोर म्हणजे चार भिंतीत खेळता यावेत अशा क्रीडा प्रकारासाठी मोठा सुसज्ज हॉल, लॉन टेनिससाठी जवळपास ५-६ लाख खर्चून वेगळे मैदान, तालुका क्रीडा अधिकाऱ्यांसाठी कार्यालयीन इमारत, असे परिपूर्ण क्रीडा संकुल उभे केले होते.
या संकुलामुळे कळंब शहर व तालुक्यातील खेळाडूंना सरावासाठी हक्काचे मैदान होईल तसेच शालेय स्तरापासून ते खुल्या स्पर्धाचे आयोजन येथे होईल, अशी अपेक्षा होती. कळंब शहर व तालुक्यातून अनेक खेळाडूंनी कोणत्याही सोई-सुविधा नसताना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखविली आहे. या क्रीडा संकुलामुळे क्रीडा क्षेत्रात उतरणाऱ्या खेळाडूंना क्रीडातज्ज्ञ मार्गदर्शन करतील, त्यांना खेळातील बारकावे समजतील व नवीन खेळाडू तयार होतील, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींना होती.
या क्रीडा संकुलाचे काम जवळपास तीन-चार वर्षांपूर्वी पूर्ण झाले. समोर विस्तृत मैदान व जॉगिंग ट्रॅकही बनविण्यात आला. परंतु, त्यानंतर ना येथे खेळ झाले, ना खेळाडू आले, ना तालुका क्रीडा कार्यालय कार्यान्वित झाले. त्यामुळे शासनाने हा कोट्यवधीचा खर्च कशासाठी केला, असा संतप्त सवालही शहरवासियांतून विचारला जात आहे.
चौकट -
दारे, खिडक्या अन् मैदानाचे कुंपणही गायब
शासनाने खेळ व खेळाडूंना वाव मिळावा, या उदात्त हेतूने उभारलेले क्रीडासंकुल आता अक्षरशः खंडर झाले आहे. या संकुलाच्या इमारतीच्या एकूण एक खिडक्या व जवळपास सर्वच दरवाजे चोरीला गेले आहेत. लॉन टेनिस खेळण्यासाठी मैदानाला चारही बाजूंने बसविलेली जवळपास १२ फूट उंचीची जाळी, त्याचे लोखंडी अँगल गायब झाले आहेत. शासनाचा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. मात्र, त्याची दाद ना फिर्याद.... त्यामुळे हे क्रीडा संकुल ना शासनाने गांभीर्याने घेतले ना प्रशासनाने, ना लोकप्रतिनिधीनीं, असेच आता म्हणावे लागणार आहे.
अवैध धंद्याने मांडले बस्तान
शहराच्या मध्यभागी असलेल्या या क्रीडा संकुल परिसरात अवैध धंद्यांनी बस्तान बसविले आहे. गावठी दारूचा वास या इमारतीमध्ये प्रवेश केल्यावर येतो. बाटल्या, गुटखा, सिगारेटच्या पुड्या अशा एक ना वस्तू येथे आढळून येतात. एका इमारतीला तर सार्वजनिक शौचालयाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे खेळासाठी बनविलेले हे क्रीडा संकुल वेगळ्याच खेळासाठी आता चर्चेत येऊ लागले आहे.
शहराला क्रीडा स्पर्धाचा इतिहास
कळंब शहरात विविध मंडळांनी मागील काळात कबड्डी, व्हॉलिबॉल, कुस्ती, क्रिकेट आदी खेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धाचे यजमानपद भूषविले आहे. या माध्यमातून चांगले खेळाडू व चांगले राजकीय नेतेही कळंबला मिळाले. दुर्दैवाने मध्यंतरी ही परंपरा खंडित झाली. या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून ती पुन्हा सुरु होईल अशी अपेक्षा होती. परंतु, ती तूर्तासतरी पूर्ण होताना दिसत नाही.
कोट...
येथील क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. येत्या २-३ महिन्यांत ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे क्रीडा संकुल देखभाल व दुरुस्तीसाठी न. प. कडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या क्रीडा संकुलाची चांगली निगा राखली जाईल. तसेच स्थानिक क्रीडा स्पर्धा, खेळाडू यांना संपर्कासाठी सुलभता येईल.
- कैलास लटके, तालुका क्रीडाधिकारी, कळंब