दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च करा; अपंग जनता दलाचे उस्मानाबादेत धरणे आंदोलन
By सूरज पाचपिंडे | Updated: August 29, 2022 14:38 IST2022-08-29T14:38:14+5:302022-08-29T14:38:47+5:30
दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व अपंग हक्क अधिनियम २०१६ ची कडक अंमलबजावणी करण्यासाठी शासनस्तरावर दिव्यांगांचे मंत्रालय स्थापन करावे

दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च करा; अपंग जनता दलाचे उस्मानाबादेत धरणे आंदोलन
उस्मानाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च करावा, या मागणीसाठी अपंग जनता दल संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
स्थानिक स्वराज संस्थांना त्यांच्या स्वनिधीतून दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी खर्च करण्याचा शासनाचा आदेश असतानाही तो निधी काही ग्रामपंचायतींकडून खर्च केला जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी खर्च करण्यात यावा, दिव्यांगांना विना अट घरकूल योजनेमध्ये समाविष्ट करावे, दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व अपंग हक्क अधिनियम २०१६ ची कडक अंमलबजावणी करण्यासाठी शासनस्तरावर दिव्यांगांचे मंत्रालय स्थापन करावे, दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी शासकीय कार्यालयाच्या परिसरात २०० चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी लावून धरल्या होत्या. आंदोलनात अपंग जनता दल संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अखिल शेख, जिल्हाध्यक्ष आर. एस. चव्हाण, जिल्हा सचिव सलीम पठाण यांच्यासह जिल्ह्यातील दिव्यांग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.