सोनारीत स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST2021-07-19T04:21:36+5:302021-07-19T04:21:36+5:30
(फोटो : अविनाश ईटकर १८) ‘लोकमत इफेक्ट’ लोगो घेणे सोनारी : ‘स्वच्छ भारत’बाबत शासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात ...

सोनारीत स्वच्छता मोहीम
(फोटो : अविनाश ईटकर १८)
‘लोकमत इफेक्ट’ लोगो घेणे
सोनारी : ‘स्वच्छ भारत’बाबत शासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असली तरी परंडा तालुक्यातील सोनारीत मात्र जागोजागी अस्वच्छतेमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच याची दखल घेत ग्रामपंचायतीने गावात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
एकीकडे कोरोनाची धास्ती अन् गावात ठिकठिकाणी अस्वच्छतेच्या साम्राज्यामुळे भविष्यात कोरोनाच्या प्रादुर्भावास थांबविताना इतर आजारांची लागण होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. गावातील अनेक भागातील नाल्या घाणीने तुडुंब भरल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून, साचलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या अनुषंगाने ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत ग्रामपंचायतीने रविवारी स्वच्छता मोहीम हाती घेत गावात ट्रॅक्टरच्या साह्याने तणनाशक फवारणी करण्यात आली. यावेळी ग्रां. पं. सदस्य अंगद फरतडे, रामकृष्ण पाटील, सोमनाथ आनवने, रवी मांडवे, अतुल जगताप, ग्रा. पं. कर्मचारी परमेश्वर पवार आदी उपस्थित होते. ज्या ठिकाणी पाणी साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे, तेथे मुरूम टाकून पाण्याचा निचरा करण्याचे काम चालू आहे. कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे कामदेखील हाती घेण्यात आले आहे. गावातील नाल्या सफाईचे काम मात्र अद्याप हाती घेण्यात आले नसल्याचे दिसत आहे.
चौकट...
नाल्यांमध्ये दगड, माती व गवत मोठ्या प्रमाणात असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पाणी साचून राहिल्याने नाल्यातून घाण वास येत असून, डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घराच्या बाहेर बसणेदेखील बंद झाले आहे.
- शालन ईटकर, ग्रामस्थ
नाल्या साफसफाईसाठी गावातील मजूर अवाढव्य पैसे (मजुरी) मागत आहेत. त्यामुळे इतर परिसरातील मजूर पाहत असून मजूर मिळताच नाल्या साफसफाईचे काम हाती घेण्यात येणार आहे.
- दीपक दुबळे, सरपंच