मोबाईल रेंजसाठी कधी रस्त्यावर तर कधी डोंगरावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:34 AM2021-07-30T04:34:29+5:302021-07-30T04:34:29+5:30

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील उमरगा (चि) या गावात कोणत्याच मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ, व्यापारी व ...

Sometimes on the road and sometimes on the mountain for mobile range! | मोबाईल रेंजसाठी कधी रस्त्यावर तर कधी डोंगरावर !

मोबाईल रेंजसाठी कधी रस्त्यावर तर कधी डोंगरावर !

googlenewsNext

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील उमरगा (चि) या गावात कोणत्याच मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ, व्यापारी व विद्यार्थी यांचे मोठे हाल होत असून, रेंज मिळविण्यासाठी रस्त्यावर, डोंगरावर भटकंती करण्याची वेळ आली आहे.

उमरगा (चि) हे जवळपास चार हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे विविध कंपनीच्या मोबाईलचे हजारो ग्राहक आहेत. परंतु, बीएसएनएलसह कुठल्याच खाजगी मोबाईल कंपनीचे गावात टॉवर नाही. गावापासून सात-आठ किमी अंतरावर असलेल्या अणदूर, चिवरी येथे टॉवर असले तरी अंतर जास्त असल्यामुळे येथून तिथपर्यंत व्यवस्थित रेंज पोहोचू शकत नाही. अधून-मधून रेंज मिळत असल्यामुळे नागरिकांना शेतात, उंचवट्याचा आधार घ्यावा लागत आहे.

कोविडच्या महामारीत शासनाने विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन शिक्षण बंद केले व ऑनलाईन शिक्षणाची सक्ती केली. पण गावात नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाला व्यत्यय येत आहे. त्यामुळे शिक्षकांना यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन गुणवत्तेचा दर्जा ढासळत आहे. कोणत्याही शासकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी देखील आता ऑनलाईन फॉर्म भरावे लागत आहेत. त्यामुळे, शासनाच्या योजनांचा लाभ घेतानाही ग्रामस्थांना मोठ्या अडचणी येत आहेत. नेटवर्कअभावी वेळेत पीक विमा न भरता आल्याने काही शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे मोबाईल कंपन्यांनी उमरगा (चि) येथे टाॅवर उभे करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे

चौकट......

गावात टाॅवर उभे करण्यासाठी विविध कंपन्यांशी आम्ही मेलद्वारे संपर्क केला. परंतु, कोणत्याच कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाही. टाॅवरच्या उभारणीसाठी स्वत:ची जागा देण्याचीही तयारी आहे. फक्त कंपनीने पुढाकार घेण्याची गरज आहे.

- आसिफ नूरमहमद शेख, ग्रामस्थ

माझ्याकडे दोन सिमकार्ड आहेत. परंतु, एकाही कंपनीची रेंज व्यवस्थित मिळत नाही. वारंवार कस्टमर केअरला तक्रारीसाठी संपर्क करतोय. परंतु, त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. आमचा व्यवसाय मोबाईलवरच अवलंबून आहे. त्यामुळे कुठल्या तरी कंपनीने टॉवर उभारणीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

- गणेश पोतदार, व्यावसायिक

गावामध्ये रेंज येत नसल्यामुळे बऱ्याच अडचणींना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागते. संबंधित कंपनीला ग्रामपंचायतीच्यावतीने अर्ज देऊन टाॅवरची मागणी करणार आहोत. कंपनीने सहमती दर्शवली तर ग्रामपंचायत टाॅवर उभारण्यासाठी जागा देखील उपलब्ध करून देईल.

- गोरोबा गायकवाड, ग्रामविकास अधिकारी, उमरगा (चि)

गावांमध्ये कुठल्याही मोबाईलला रेंज येत नाही. सध्या ऑफलाईन शिक्षण बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण हा पर्याय निवडला होता. परंतु, रेंज नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी व्यत्यय येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

- विठ्ठल जेटीथोर, मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला

Web Title: Sometimes on the road and sometimes on the mountain for mobile range!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.