कळंब : सोशल मीडिया हा जसा प्रबोधनाचे, विचार व्यक्त करण्याचे, मनोरंजनाचे, माहितीच्या देवाणघेवानाचे प्रभावी साधन बनले आहे तसेच ते हिंसक प्रवृत्तीना, लोकांना, समूहाना व समाजविघातक घटकानाही स्वबळ दाखविण्याचे माध्यम बनत असल्याचे दुर्दैवी चित्रही समोर येते आहे. वाढदिवस साजरे करताना तलवारीने केक कापणे, चाकूने फुगे फोडणे, हवेत गोळीबार करणे, खुलेआम मद्यपान करून गोंधळ घालणे असे प्रकार आता सर्रास सोशल मीडियावर बघायला मिळतात. बऱ्याचदा पोलीस प्रशासन त्यांच्यावर कार्यवाहीही करते, पण पुन्हा पुन्हा असे प्रकार घडत असल्याने सोशल मीडियाच्या उपयुक्ततेवरही आता प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
चौकट -
दाखल गुन्हे -
कळंब पोलीस स्थानकात २०२० मध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमात शस्त्राने केक कापल्यासंदर्भात एक तर सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडीओ करून लोकप्रतिनिधिना अश्लाघ्य भाषा वापरल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात जाहीर ठिकाणी तलवारीने केक कापण्याचे प्रकार मागील काही वर्षात झाले, पण त्याबाबत कोणी फिर्याद दिली नसल्याने वा पोलीस प्रशासनाच्या ते निदर्शनास न आल्याने त्यांच्यावर कार्यवाही झाली नसल्याचे सांगितले जात आहे.
चौकट -
तलवारी येतात कोठून?
तलवारी, चाकू असे घातक शस्त्र बाळगणे कायद्याने गुन्हा असताना काही मंडळी स्टेज मांडून त्यावर वाढदिवसाचे केक तलवारी नाचवत कापत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळते. या शस्त्रांना बाळगण्यास कायद्याने बंदी असताना या तलवारी संबंधितांच्या हातात येतात कशा? तलवारी नाचवून केक कापणे हे कोणाला भीती दाखवण्यासाठी केले जाते? त्या मंडळींवर कार्यवाही का होत नाही, असे प्रश्नही आता उपस्थित होत आहेत.
चौकट -
अवैध धंद्यातील मंडळींचा ''पॅटर्न ''!
अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात कमाई होते आहे. कळंब तालुक्यात वाळू माफिया, जुगार क्लब, अवैध दारू, मटका या अवैध धंद्यात अनेकांनी मोठी रक्कम कमावली आहे. त्यातूनच अंगात रग वाढल्याने तलवारी, चाकू आदी शस्त्राचा वापर वाढदिवसासारख्या सोहळ्यात होतो आहे. त्याला राजकीय वरदहस्तही असल्याने ही मुजोरी वाढल्याचे चित्र आहे.
चौकट -
लाईक करणारेही येऊ शकतात अडचणीत!-
आपल्या जवळच्या व्यक्तीने किंवा मित्र यादीतील कोणी असे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले तर अनेकजण सहजपणे त्याला लाईक करतात. ते चित्र, व्हिडीओ लाईक करणे म्हणजे त्याला प्रोत्साहन देणे असेही होऊ शकते, त्यामुळे लाईक करणाऱ्यांनाही आता आपण कशाला लाईक करतोय, याचेही भान ठेवावे लागेल.
कोट......
तलवारीने, चाकूने केक कापणे, हवेत गोळीबार करणे आदी प्रकार पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले किंवा कोणी तक्रार केली तर त्याची खातरजमा करून पोलीस संबंधितावर शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करेल. मागील तीन वर्षात अशा घटनेत एक गुन्हा आम्ही दाखल केला आहे. सोशल मीडियावर असे व्हिडीओ, फोटो अपलोड करणाऱ्यावर आमची नजर आहे.
- तानाजी दराडे, पोनि, कळंब