उस्मानाबाद : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राला विद्यापीठाचा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात चार महिन्यांपूर्वी समिती स्थापन करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले होते. मात्र, आजतागायत ही समितीच स्थापन झाली नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आल्याने विद्यापीठ निर्मितीचे भिजत घोंगडे कायम राहिले आहे.
उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. विद्यापीठासाठी आवश्यक असणारी जमीन, भौतिक सुविधा याठिकाणी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे या मागणीला अधिक जोर आला आहे. दरम्यान, ही मागणी लक्षात घेऊन खासदार ओम राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी पुढाकार घेत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे या विषयावर ऑगस्टमध्ये बैठकही लावण्यात आली होती. या बैठकीत तातडीने माजी कुलगुरू एस. एन. माळी यांच्या अध्यक्षतेखाली डी. टी. शिर्के, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी प्राचार्य डॉ. अनार साळुंखे, शिक्षणतज्ज्ञ एम. डी. देशमुख, सिनेट सदस्य संजय निंबाळकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्यासह औरंगाबाद व उस्मानादच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असणारी समिती स्थापन करून तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना मंत्री उदय सामंत यांनी दिल्या होत्या. मात्र, आजतागायत यावर कसलीही कार्यवाही झालेली नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. उस्मानाबाद येथील शीतल वाघमारे यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे या समितीबाबतची माहिती मागितली होती. या विभागाने विद्यापीठाकडे चेंडू टोलवून तेथून माहिती देण्यास सांगितले. नुकतेच यावर विद्यापीठाने उत्तर दिले असून, अशी कुठलीही समिती स्थापन केल्याचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे विद्यापीठ निर्मितीचे घोंगडे अजूनही भिजतच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोट...
आपण स्वत:ही विद्यापीठ निर्मितीबाबत सातत्याने प्रयत्न करत आहोत. येथील खासदार व आमदारांनी याप्रश्नी पुढाकार घेऊन मंत्र्यांकडे बैठक लावण्यास भाग पाडले होते. मात्र, बैठकीत ठरल्याप्रमाणे अद्याप काहीच घडलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी याकडे लक्ष देऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-संजय निंबाळकर, सिनेट सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद