रुग्ण वाढू लागल्याने शिवजयंतीचे कार्यक्रम तात्पुरते स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:01 IST2021-02-21T05:01:46+5:302021-02-21T05:01:46+5:30
उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १४ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या ...

रुग्ण वाढू लागल्याने शिवजयंतीचे कार्यक्रम तात्पुरते स्थगित
उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १४ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केल आहेत. १९ फेब्रुवारीपर्यंतचे कार्यक्रम कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून पार पडले आहेत. मात्र, रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने २० ते २१ फेब्रुवारी दरम्यानच्या कार्यक्रमास परवानगी नाकारली आली. त्यामुळे या कालावधीत होणारे कार्यक्रम तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे, मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
कोविड १९च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने २० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी समितीच्या वतीने सांगण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १४ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी रोजी भरगच्च कार्यक्रमाची आखणी केली होती. १४ फेब्रुवारी रोजी बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड यांचे ‘रोजगाराच्या संधी आणि आव्हान’ या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. १६ फेब्रुवारी रोजी आरोग्य शिबिर, १८ फेब्रुवारी रोजी सायकल रॅली, १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या अश्वरुढ पुतळ्यास महाभिषेक साेहळा असे कार्यक्रम पार पडले. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारीपासून होणारे कार्यक्रम स्थगित करण्याबाबत आवाहन केले होते. त्यामुळे कोविडची खबरदारी म्हणून ‘चला हवा येऊ द्या’, कॉमेडी शो व ऑर्केस्ट्रा, तसेच शंभूराजे महानाट्य हे कार्यक्रम तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याचे समितीच्या सदस्य म्हटले. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आशिष मोदानी, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांची उपस्थिती होती.