तरुणांच्या पुढाकारातून गावातच उभारले विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:34 IST2021-05-21T04:34:06+5:302021-05-21T04:34:06+5:30
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथून जवळ असलेल्या हातोला येथील गावात कोरोना रुग्ण संख्या वाढत असून, अनेकजण गृहविलगीकरणात उपचार ...

तरुणांच्या पुढाकारातून गावातच उभारले विलगीकरण कक्ष
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथून जवळ असलेल्या हातोला येथील गावात कोरोना रुग्ण संख्या वाढत असून, अनेकजण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. त्यामुळे गावातील तरुणांनी पुढाकार घेत गावाबाहेर असलेल्या सत्यवती जोगदंड विद्यालयात विलगीकरण कक्षाची निर्मिती केली असून, या ठिकाणी सध्या ४६ रुग्ण दाखल आहेत.
वाशी येथील कोविड केअर सेंटरमध्ये सध्या विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाले आहेत. त्यातच हातोला गावातही रुग्णसंख्या वाढू लागली असून, येथील रुग्णांना नोंदणी करून घेतल्यानंतर गृहविलगीकरणात ठेवले जात आहे. दरम्यान, विलगीकरणाचा कालावधी पूर्ण होण्याआधीच काही रुग्ण गावभर फिरत आहेत. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेत गावातील तरुणांनी पुढाकार घेत गावातच विलगीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.
हे विलगीकरण केंद्र ७ मे पासून सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सध्या ४६ रुग्ण आहेत. हे विलगीकरण केंद्र गावापासून लांब अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने वातावरण प्रसन्न आहे. शाळेच्या सहा खोल्या यासाठी ताब्यात घेण्यात आल्या असून, महिला व पुरुषांसाठी स्नानगृह, स्वच्छतागृहाची स्वतंत्र सोय आहे. रुग्णाच्या शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक आधार देण्याचे कामही गावातील तरुण येथे करीत आहेत. रुग्णांना दररोज व्यायाम शिकविला जातो. तरुणांनी प्रत्येक घरात एक लिटर सॅनिटायझर वाटप केले असून, गावात दर तीन दिवसाला फवारणी केली जात आहे. गावातील गणेश मंडळानेदेखील या विलगीकरण केंद्रातील रुग्णांसाठी एक लाखाचा निधी दिला आहे.
या केंद्रास गटविकास अधिकारी विलास खिल्लारे, तहसीलदार नरसिंग जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्रकर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी दीपक सोनवणे हे सातत्याने भेट देत आहेत. गावातील पाच अख्खे कुटुंबच या विलगीकरण केंद्रात दाखल असून, येथील रुग्णाच्या आरोग्य तपासणी पारगाव येथील डॉ. चंद्रशेखर कोकणे, आरोग्यसेवक राहुल गव्हाणे करीत आहेत. राहुल गव्हाणे हे दिवसातून दोन वेळा जाऊन रुग्णांना औषध गोळ्या देत आहेत. गावातील ॲड. विठ्ठल खवले, उपसरपंच संजय गवळी, अनिकेत आहिरे, सचिन यादव, प्रवीण खवले, निवांत खोमणे, विकास हराळे, नितीन गवळी, ए. डी. उमाप, आशा कार्यकर्ती कौशल्या गायकवाड, आदीजण या ठिकाणी सेवा देत आहेत.
कोट....
गावातील नागरिकांची तपासणीसाठी उदासीनता होती. मात्र, गावात विलगीकरण केंद्र सुरू केल्यानंतर व त्या ठिकाणची व्यवस्था पाहता नागरिकांच्या मनातील भीती कमी झाली आहे, त्यामुळे आता नागरिक स्वतःहून तपासणीसाठी येत आहेत. गावात रुग्ण संख्या वाढत आहे. त्या सर्वांची व्यवस्था विलगीकरण केंद्रात केलेली आहे. या ठिकाणी रुग्णांची शारीरिक आरोग्य राखण्यासोबतच मानसिक आधारही दिला जात आहे.
- ॲड. विठ्ठल खवले
माझा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही मी विलगीकरण केंद्रास येण्यास तयार नव्हतो. परंतु, मित्राच्या सल्ल्यानंतर येथे आलो. नंतर येथील रुग्ण संख्या वाढत गेली. गावातील तरुणांनी सर्व व्यवस्था केली आहे. मीदेखील येथे रुग्णांना चहा, दूध, जेवण देणे अशी कामे करीत होतो. आज सुटी होत आहे.
- रुग्ण