दुय्यम निबंधकांचे ‘दस्त’ ठरताहेत डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:13 IST2021-02-05T08:13:48+5:302021-02-05T08:13:48+5:30
कळंब : येथील दुय्यम नोंदणी कार्यालयातील दस्त नोंदणीबाबत आजवर अनेक तक्रारी होत्या. परंतु, आता सदर ‘खातं’ अन् त्याचे ...

दुय्यम निबंधकांचे ‘दस्त’ ठरताहेत डोकेदुखी
कळंब : येथील दुय्यम नोंदणी कार्यालयातील दस्त नोंदणीबाबत आजवर अनेक तक्रारी होत्या. परंतु, आता सदर ‘खातं’ अन् त्याचे ‘दस्त’ आमच्या विभागाची ‘डोकेदुखी’ ठरत असल्याची तक्रार खुद्द तलाठी संघटनेने थेट राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या कारभाराची लक्तरे प्रशासनातील दुसऱ्या विभागाने मांडल्याने, यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जमीन, जागा आदी स्थावर मालमत्ता व त्यावरील मालकी हक्क, बोजा संबंधित दस्तनोंदणी करण्याचे काम दुय्यम निबंधक कार्यालय करते. यासाठी संबंधित कार्यालयास महसूल विभाग, नगरविकास विभाग, नोंदणी महानिरीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय आदी विभागांच्या नियम, आदेश व परिपत्रक यास अधीन राहून दस्तनोंदणी करावी लागते. यासंबंधी असलेल्या कायद्याचा, अधिनियमांचा, अधिसूचनांचा भंग किंवा उल्लंघन होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. कळंब येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मात्र उपरोक्त नियमांना धरून आजवर दस्तनोंदणी झाली का? हा मोठा संशोधनाचा विषय आहे. शिवाय, मागच्या दीड-दोन वर्षांत तर रिक्त असलेल्या येथील पदावर चक्क कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पदभार देण्यात येऊन कारभार हाकण्यात आला आहे. अशा या दुय्यम निबंधक कार्यलायाच्या आजवर अनेक तक्रारी झाल्या. मात्र, यावेळी खुद्द दुसरा प्रशासकीय घटक असलेल्या मंडळ अधिकारी व तलाठी संघटनेने राज्याचे नोंदणी महानिरीक्षक यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कैफियत मांडली आहे. त्यात कायदा, परिपत्रक, नियम धाब्यावर बसवून दस्तनोंदणी केली जात आहेत व यामुळे सदर फेरफार करावेत, यासाठी तलाठ्यांवर लोक दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याची त्यांनी उदाहरणार्थ काही प्रकरणांचे संदर्भही दिले आहेत. उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांना दिलेल्या निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रदीप पारखे, मंडळ अधिकारी तुळशीराम मटके, एन. बी. भिसे, तलाठी प्रवीण पालखे, भातलवंडे, कावळे, लोमटे यासह १६ सज्जाच्या तलाठी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
चौकट...
तुकडे बंदी कायद्याचा सर्सास भंग
शासनाच्या मुंबई तुकडे बंदी कायद्यात असलेल्या तरतुदीचा व यातील नियमांचा भंग होणार नाही याची दुय्यम निबंधकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कळंब येथील कार्यालयात मात्र काळजी तर सोडा हमखास तुकडे बंदी कायद्याचा भंग केला जात दस्त नोंदणी केली गेली आहे. जिरायत क्षेत्र बागायत दर्शविले जात आहे. ऑनलाईन बंद असताना ऑफलाईन दस्त नोंदवताना अनियमितता झाल्याची तक्रार करत तलाठी संघटनेने यासाठी तांदुळवाडी येथील २८ डिसेंबरच्या नोंदविलेल्या दस्ताचा दाखलादेखील दिला आहे.
अकृषी जमिनीच्या दस्त नोंदीत घोळ
अकृषी जमीन खरेदीसंदर्भात काही नियम आहेत. अंतिम रेखांकन, अकृषी आदेश असेल तरच खरेदी-विक्री करावी, रस्ते व इतर स्पेस यांची नियमाने टोकन रजिस्ट्री करावी, असे निर्देश असताना याकडे डोळेझाक करण्यात आली आहे. अकृषी आदेश व रेखांकन संशयास्पद असून, याचा तलाठी व संबंधितांना त्रास सहन करावा लागत आहे, असे नमूद करण्यात आले आहे.
उदाहरणासह आक्षेप
यावेळी दिलेल्या निवेदनात तलाठी संघटनेने तांदुळवाडी येथील ३० डिसेंबर, १२ नोव्हेंबर, सापनाई येथील १३ जानेवारी, शेळका धानोरा येथील ३० डिसेंबर यासह निपाणी, ढोराळा येथील दस्तनोंदणीचे दाखले दिले आहेत.
हे आहेत गंभीर आक्षेप
शेतकरी असल्याशिवाय जमिनीची खरेदी करता नाही. याची दस्त नोंदणी करताना कसलीही खात्री केलेली नाही. जुने खाते असताना नवीन खाते दर्शविले आहे. त्यामुळे एका व्यक्तीचे दोन खाती होत आहेत. अनावश्यक प्रमाणपत्राची मागणी व यातून बनावट कागदपत्रांचा स्वीकार. रस्ते, ओपन स्पेस यांची वजावट न करता व्यवहार व याची नोंद. नियम, सूचना यांचे पालन न करता बेकायदेशीर दस्त नोंदणी यामुळे फेरफार नोंदवताना अडचणी येत आहेत. यातून लोक तलाठी यांच्याशी संघर्ष करतात. त्यामुळे हे प्रकार बंद व्हावेत किंवा याप्रकरणी कार्यवाही व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.