दुसऱ्या लाटेतील दीड हजारांवर नागरिकांनी कोरोनाला हरविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:36 IST2021-05-25T04:36:37+5:302021-05-25T04:36:37+5:30
लोहारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरासह तालुक्यातील जवळपास सर्वच गावांत कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळून आले होते. या लाटेतील आजवरची ...

दुसऱ्या लाटेतील दीड हजारांवर नागरिकांनी कोरोनाला हरविले
लोहारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरासह तालुक्यातील जवळपास सर्वच गावांत कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळून आले होते. या लाटेतील आजवरची रुग्णसंख्या २ हजार १८७ एवढी झाली असून, यातील तब्बल १ हजार ७५८ रुग्णांनी औषधोपचाराच्या साहाय्याने यावर यशस्वी मात केली आहे. विशेष म्हणजे, तालुक्यात सात गावांत सद्य:स्थितीत एकही कोरोना रुग्ण नाही.
तालुक्यात मागील वर्षी कोरोनाची रुग्ण संख्या आणि मृत्युदरही कमी होता. शिवाय, नागरिकांमध्ये कोरोनाविषयी प्रचंड भीतीही निर्माण झाली होती. काही महिन्यांत रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर बाजारपेठ पूर्वपदावर आली; परंतु, मार्च २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. त्यामुळे राज्य शासनाने कडक निर्बंध लादले. दीड महिन्याच्या कालावधीत रुग्णसंख्या तसेच मृत्युदरही झपाट्याने वाढला होता; परंतु, नागरिकांना मात्र याचे कसलेच गांभीर्य नव्हते. प्रशासनाने नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला तरी पळवाटा काढत नागरिक बाहेर फिरत होते. या काळात तालुक्यात दररोज ४० ते ७० कोरोना रुग्ण आढळत होते. शिवाय, दररोज दोन-तीन मृत्यू होत होते. त्यामुळे प्रशासनाने शहरातील ग्रामीण रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतर्गतदेखील कोरोनाच्या तपासण्या सुरू केल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात २ हजार १८७ रुग्ण आढळले होते; परंतु योग्य उपचारामुळे १ हजार ७५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, ३७ जणांचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण ३९२ आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ८०.३८ टक्के, तर मृत्युदर १.६९ टक्के इतका आहे. बाधितांवर योग्य उपचार झाल्याने मागील आठवड्यापासून रुग्ण संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे.
चौकट.....
ही गावे सध्या कोरोनामुक्त
लोहारा तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण आढळले होते. त्यात बेंडकाळ, बेलवाडी, चिचोंली रेबे, एकोंडी, फणेपूर, जेवळी (द.), रुद्रवाडी या गावांचाही समावेश आहे. यातील काही गावांमध्ये कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत गावस्तरावर योग्य उपाययोजना, कोरोनाविषयी जनजागृती यामुळे या सात गावांत आज एकही रुग्ण नाही.
या ठिकाणी उपचाराची सोय
लोहारा शहरात ग्रामीण रुग्णालय, सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालय व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र वगळता तालुक्यात सोयी-सुविधांयुक्त एकही खासगी मोठे रुग्णालय नाही. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, तुळजापूर येथे जाण्याशिवाय पर्याय नाही. असे असतानाही लोहारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व आयटीआय कॉलेजमधील कोविड सेंटर, माकणी ग्रामपंचायतीचे आयसोलेशन केंद्र, जेवळी ग्रामपंचायतीचा विलगीकरण कक्ष, सास्तूर येथे शिवसेना व स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे विलगीकरण कक्ष या ठिकाणी योग्य उपचार करून रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.
मदतीसाठी अनेक हात सरसावले
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजागृतीसोबतच कोरोना रुग्ण व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी अनेकांचे हात पुढे आले. यात सामाजिक संस्था, राजकीय पक्षाकडून मास्क, सॅनिटायझर, वाफेच्या मशीन, किराणा कीट, जेवण, स्पिकर संच, औषधे, ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले. यासाठी सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालय, हराळी येथील ज्ञानप्रबोधिनी संस्था, काँग्रेस पक्ष, शहरातील हाजी शब्बीर अहेमद अन्सारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उदतपूर ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पाटील, जालिंदर कोकणे, आयुब शेख, भाजपाचे विक्रांत संगशेट्टी, राजेंद्र पाटील, शिवसेनेचे अमिन सुंबेकर, अमोल बिराजदार, महेबूब फकीर, भरत सुतार, नागूर येथील टायगर ग्रुपचे अक्षय पवार आदींनी पुढाकार घेतला.
फोटो - लोहारा शहरातील कोविड सेंटरमध्ये कोरोनावर मात केलेल्या नागरिकांचा आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी किरण गायकवाड, डॉ. जी. के. साठे, डॉ. अशोक कटारे, रमाकांत जोशी आदी.