कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डिप्रेशन वाढविले; औषधांची विक्रीही वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST2021-06-22T04:22:30+5:302021-06-22T04:22:30+5:30
उस्मानाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्र स्वरूपाची होती. त्यामुळे या लाटेत तरुण वयोगटातील व्यक्तींचे मृत्यू मोठ्या ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डिप्रेशन वाढविले; औषधांची विक्रीही वाढली!
उस्मानाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्र स्वरूपाची होती. त्यामुळे या लाटेत तरुण वयोगटातील व्यक्तींचे मृत्यू मोठ्या संख्येने झाले आहेत. कुटुंबातील कर्ती व्यक्ती दगावल्याने घरातील इतर व्यक्तींचे डिप्रेशन वाढले आहे. परिणामी, मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत कोरोनाची पहिली लाट धडकली होती. या लाटेत वयोवृध्द व्यक्तींचे मृत्यू मोठ्या प्रमाणात झाले होते. तर दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा तीव्र स्वरूपाची असल्याने यात तरुण वयोगटातील कमवत्या व्यक्तींचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने घरातील इतर व्यक्तीं ताणतणावात जीवन जगू लागल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती तसेच त्या कुटुंबातील अन्य व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण वाढू लागले. घरातच कोंडून राहिल्याने समाजाशी संवाद कमी झाल्याने एकलकोंडेपणामुळे चिडचिडेपणा, उदासिनतेत वाढ होऊ लागली. तसेच अनेक व्यक्तींचे व्यवसाय बंद राहिले. त्याचा आर्थिक फटका नागरिकांना सहन करावा लागला. आर्थिक अडचणींमध्ये भर पडल्याने डिप्रेशन वाढले आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत डिप्रेशनच्या रुग्णात २० टक्क्यांनी भर पडली असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांंगितले. डिप्रेशन वाढल्याने मेडिकल दुकानात मानसिक आजारावरील औषधातही वाढ होत असल्याचे औषध विक्रेते म्हणाले.
हे टाळण्यासाठी काय कराल?
१. डिप्रेशन टाळण्यासाठी नागरिकांनी लक्षणे आढळून येताच मानसोपचारतज्ज्ञांकडे जाऊन समुपदेशन घेणे गरजेचे आहे.
२. ताणतणावापासून दूर राहण्यासाठी सकस आहार व नियमित व्यायामाची आवश्यकता आहे.
३. कोणत्याही नकारात्मक विचाराला थारा न देता सकारात्मक विचार करणे.
४. एकलकोंडे न राहता विविध व्यक्तींशी तसेच कुटुंबातील व्यक्तीशी नेहमी संवाद साधून विचारांची देवाणघेवाण करणे.
५. व्यसनापासून दूर राहणे.
डिप्रेशन का वाढले
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढले. यात अनेकांच्या कुटुंबातील कर्त्या व्यक्ती दगावल्या.
कोरोना झाल्यानंतर त्यातून आपण बरे होऊ का नाही हा विचार करणे.
लस घेतली नाही आपल्याला कोरोना झाला तर आपण बरे होऊ का, आपल्यानंतर मुलांचे काय होईल अशा विचारात राहणे.
कडक निर्बंधांमुळे नागरिक घरातच होते. या काळात समाजाशी संवाद कमी झाला. विचारांची देवाणघेवाण न झाल्याने डिप्रेशन वाढले.
औषधविक्री दुपटीने वाढली
अगोदर क्वचित रुग्ण मानसिक आजाराची औषधे घेण्यासाठी औषधांच्या दुकानावर येत होते. मात्र, कोराेना काळात औषधांच्या दुकानावर मनोविकार तज्ज्ञांनी लिहून दिलेली औषधे घेण्यासाठी रुग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक येत आहेत.
- एक औषध विक्रेता
दुसऱ्या लाटेत २७ ते ३५ वयोगटातील व्यक्तींचे मृत्यू अधिक झाले. त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती डिप्रेशनमध्ये जात आहेत. ताणतणावामुळे प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. कडक निर्बंधांमुळे नागरिक घरात असल्याने संवाद कमी झाला आहे. मानसिक आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी पौष्टिक आहार, नियमित व्यायाम व व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे.
- डॉ. महेश कानडे, मनोविकारतज्ज्ञ
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डिप्रेशन वाढले आहे. याचे चिंता व भीती हे मुख्य कारण आहे. ताणतणाव टाळण्याकरिता नियमित व्यायाम, पुरेशी झोप, सकस आहार, रात्री मोबाइलचा वापर कमी करणे, तसेच वेळीच समुपदेशन करणे गरजेचे आहे.
- डॉ. राजेश नरवडे, मनोविकारतज्ज्ञ