लोहारा : कोरोनामुळे गेले दिड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, खाजगी शाळांकडून ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्याचे काम सुरु आहे. यासाठी विविध प्रकारचे ॲप वापरले जात आहेत. मात्र, काही फुकटच्या ॲपमुळे ऑनलाईन शिक्षणात चांगलाच ताप वाढला आहे. अशा ॲपच्या माध्यमातून अचानक अश्लिल मॅसेज येत असल्याने सर्वाचीच झोप उडाली आहे. त्यामुळे कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याआधी त्यांची विश्वासहर्ता तपासून घेणे गरजेचे आहे.
शाळांनी ही घ्यावी काळजी
शैक्षणिक कामासाठी ॲप घेताना शाळा, महाविद्यालाने मान्यता प्राप्त व विश्वासार्हता असलेल्या संस्थेच्या ॲपचा वापर करावा. शैक्षणिक सत्र सुरु असताना जाहीराती येत असतात. त्या येऊ नयेत यासाठी सेटिंगमध्ये जाऊन जाहिराती थांबवण्यासाठी मॅसेज करावा. यासोबतच ॲपच्या वापराबाबत विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे ज्ञान आहे किंवा नाही याची माहिती घेऊन गरजेनुसार त्यांना प्रशिक्षण द्यावे.
पालकांनीही दक्ष राहण्याची गरज
मुलांना अधिक वेळ मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्हीसमोर बसू देऊ नका. कॉम्प्युटर, टीव्ही खुल्या जागेत ठेवा आणि मुलांच्या वेळेवर नियंत्रण ठेवा. मुलाचे ऑनलाईन शिक्षण सुरु झाले तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. मुले ऑनलाईनच्या नावाखाली गेम तर खेळत नाहीत ना, याची वेळोवेळी तपासणी करा. ऑनलाईन शिक्षण झाल्यानंतर संगणक बंद करा. मुलांकडील मोबाईल काढून घ्या. जेवढा वेळ ऑनलाईल शिक्षण आहे, तेवढाच वेळ मुलांना मोबाईल द्या.
असे घडू शकते
ऑनलाईन शिक्षण सुरु असताना मध्येच अश्लील व्हीडीओ डाऊनलोड होतात. किंवा संबंधित ॲपवर घाणेरड्या जाहिराती येतात. यामुळे अचानक गोंधळाची स्थिती निर्माण होते. त्यामुळे असे घडू नये यासाठी मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरु असताना त्यांच्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
कोरोना संसर्गामुळे सध्या घरातूनच ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र, शिक्षण सुरु असतानाच एखाद्या वेळी नको ते व्हिडीओ, जाहिराती येतात. त्यामुळे शिक्षणात व्यत्यय होतो. शिवाय, विद्यार्थ्यांचे मनही विचलित होते. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी चांल्या दर्जाचे, विश्वासार्हता असलेले ॲपच डाऊनलोड करून घ्यावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये.- विकास घोडके, मुख्याध्यापक, मोघा (खु)