शाळा प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST2021-03-07T04:29:35+5:302021-03-07T04:29:35+5:30
(फोटो : बालाजी बिराजदार ०६) लोहारा : येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी धानुरी ...

शाळा प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
(फोटो : बालाजी बिराजदार ०६)
लोहारा : येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी धानुरी येथील जिल्हा परिषद शाळेला शनिवारी अचानक भेट दिली. यावेळी ‘सुंदर माझे कार्यालय’ उपक्रमाच्या अनुषंगाने शाळा प्रशासनाने कसलीही कार्यवाही केली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या गटविकास अधिकाऱ्यांना मुख्याध्यापकांची कानउघडणी करीत ‘आपणाला सक्तीच्या रजेवर का पाठविण्यात येऊ नये,’ अशी विचारणा केली.
विभागीय आयुक्त केंद्रेकर याच्या संकल्पनेनुसार ‘सुंदर माझे कार्यालय’ हा उपक्रम सर्व जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांच्यांतर्गत सर्व तालुकास्तरीय कार्यालयात राबविण्याच्या सक्त सूचना आहेत. यानुसार, गटविकास अधिकारी सोपान अकेले व सहायक गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख यांची दोन वेळेस पंचायत समिती कार्यालयात बैठक घेऊन सविस्तर लेखी व तोंडी बैठकीत सूचना दिल्या, तसेच मार्गदर्शन केले. असे असतानाही धानुरी शाळेने मात्र याबाबत कसलीही कार्यवाही केली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे याबाबत दोषींना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागविण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी अकेले यांनी सांगितले आहे.
दरम्यान, ‘एक दिवस शाळेसाठी’ मोहिमेंतर्गत अधिकाऱ्यांनी शाळांना अचानक भेटी देऊन उपक्रमाच्या अंमलबजावणीची पाहणी करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार, शनिवारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले व सहायक गटविकास अधिकारी संजय ढाकणे यांनी तालुक्यातील धानुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अचानक भेट दिली. यावेळी ‘सुंदर माझे कार्यालय’ या अंतर्गत शाळेने कसलीही कार्यवाही केली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे संतप्त झालेले गटविकास अधिकारी अकेले यांनी मुख्याध्यापकांची झाडाझडती घेऊन, त्यांना सक्तीचा रजेवर पाठवायची कार्यवाही का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली, तसेच या प्रकरणी गटशिक्षण अधिकारी व विस्ताराधिकारी यांनाही स्वतंत्र नोटीस देऊन खुलासा मागविण्यात येणार असल्याचे अकेले यांनी सांगितले.
दोन महिन्यांपासून पाण्याचा बोअर बंद
धानुरी जिल्हा परिषद शाळेतील एक बोअर मागील दोन महिन्यांपासून बंद असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्याबाबतही तीन दिवसांची मुदत देऊन बंद बोअर सुरू केल्याचा लेखी अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्या, शिवाय ‘सुंदर माझे कार्यालय’ याबाबत मुख्याध्यापकांना सूचना किंवा मार्गदर्शन करण्यात आले.
वृक्षसंगोपनात निष्काळजीपणा
गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीवेळी या शाळेतील एक शिक्षक मागील तीन दिवसांपासून अनधिकृत रजेवर असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईच्या सूचना त्यांनी केल्या. या शाळेच्या काही वर्गखोल्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे याच्या निर्लेखनाबाबत तत्काळ कार्यवाहीच्या सूचनाही त्यांनी केल्या. शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आली असली, तरी त्याच्या संगोपनाकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे, तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच अथवा आसन पट्टीची सोय नसल्याचे विद्यार्थी फरशीवर बसल्याचेही दिसून आले. कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने मात्र सर्व विद्यार्थी व शिक्षक नियमांचे कडक पालन करीत होते.