‘झेडपी’च्या ६१ शाळांवरून गेल्यात धाेकादायक विद्युत तारा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:32 IST2021-01-20T04:32:23+5:302021-01-20T04:32:23+5:30
घरावरून वा कार्यालयांच्या इमारतींवरून गेलेल्या विद्युत वाहिन्या तुटून दुर्घटना घडल्याच्या बातम्या अधून-मधून कानावर पडतात. विशेषत: पावसाळ्यात अशा घटना अधिक ...

‘झेडपी’च्या ६१ शाळांवरून गेल्यात धाेकादायक विद्युत तारा...
घरावरून वा कार्यालयांच्या इमारतींवरून गेलेल्या विद्युत वाहिन्या तुटून दुर्घटना घडल्याच्या बातम्या अधून-मधून कानावर पडतात. विशेषत: पावसाळ्यात अशा घटना अधिक प्रमाणात घडतात. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने शहरी तसेच ग्रामीण भागातील जि.प. शाळांच्या इमारतीवरून तसेच मैदानातून धाेकादायकरीत्या विद्युत तारा गेलेल्या शाळांची माहिती मागविली हाेती. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने ही माहिती शिक्षणाधिकारी यांना सादर केली असता, ही संख्या तब्बल ६१ वर पाेहाेचली. गावनिहाय शाळांची माहिती हाती आल्यानंतर शिक्षण विभागाने १८ फेब्रुवारी २०२० राेजी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांच्या नावे पत्र देऊन हा प्रश्न मांडला. वीज तारा तातडीने शिफ्ट कराव्यात, असे त्यात म्हटले; परंतु पत्राची साधी दखलही घेतली नाही. यानंतर २३ मार्च राेजी दुसरे पत्र दिले. त्यासही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे १४ सप्टेंबर २०२० राेजी तिसरे पत्र दिले; परंतु यानंतरही वीज कंपनीला विद्यार्थ्याच्या सुरक्षेची चिंता वाटली नाही. त्यामुळे आजही शाळांच्या इमारतीवरून धाेकादायकरीत्या गेेलेल्या वीज वाहिन्या कायम आहेत. दरम्यान, मंगळवारी झालेल्या शिक्षण विषय समितीच्या बैठकीत यावरून वादळी चर्चा झाली. त्यानुसार वीज महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या नावे पत्र देण्याचे आदेश उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी दिले.
चाैकट...
तर अधीक्षक अभियंता कारणीभूत असतील -सावंत
धाेकादायकरीत्या शाळांवरून गेलेल्या तारा हटविण्याबाबत शिक्षण विभाग तीन-तीन वेळा पत्रव्यवहार करीत आहे. शाळानिहाय यादी त्यांना दिली आहे. असे असतानाही पत्र गांभीर्याने घेतले जात नाही. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे भविष्यात दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास थेट अधीक्षक अभियंता यांना कारणीभूत धरले जाईल, असा इशारा जि.प.चे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी बैठकीत इशारा दिला.
चाैकट...
दृष्टिक्षेपात शाळा
तालुका संख्या
उस्मानाबाद ०४
तुळजापूर ०२
उमरगा १८
लाेहारा ०६
भूम ०६
वाशी १९
परंडा ०३
कळंब ०६