कोतवालाच्या सूनबाई झाल्या गावच्या सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:34 IST2021-02-11T04:34:02+5:302021-02-11T04:34:02+5:30
कारी : तालुक्यातील कारे ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदाची निवड बिनविरोध पार पडली. यावेळी सरपंचपदी नीलिमा अनिल कदम तर उपसरपंचपदी खासेराव ...

कोतवालाच्या सूनबाई झाल्या गावच्या सरपंच
कारी : तालुक्यातील कारे ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदाची निवड बिनविरोध पार पडली. यावेळी सरपंचपदी नीलिमा अनिल कदम तर उपसरपंचपदी खासेराव विनायक विधाते यांची बिनविरोध निवड झाली. नीलिमा कदम या येथील कोतवाल नानासाहेब कदम यांच्या स्नुषा आहेत. ग्रामपंचायतीच्या अटीततिच्या लढाईत विधाते, हवेली व तिसरी आघाडी यांच्या खंडेराया ग्राम विकास आघाडी गटाला ९ जागा तर डोके-गायकवाड यांच्या तुळजाभवानी ग्रामविकास आघाडी गटाला ४ जागा मिळाल्या. नवनिर्वाचित सरपंच नीलिमा कदम यांचे दिवंगत आजे सासरे लालासाहेब कदम यांनी गावचे बरीच वर्षे कोतवाल म्हणून काम पाहिले, शिवाय त्यांचे सासरे नानासाहेब कदम आजही कारी गावचे कोतवाल आहेत. त्यामुळे गेल्या दोन पिढ्या गावचे कोतवाल म्हणून कार्यरत असणाऱ्या या कुटुंबातील सदस्यांना आता सरपंच होण्याचा मान मिळाला आहे. निवडीच्या वेळी नूतन सदस्य सना फीरदोस जमीर मुलाणी, लता डोके, अमोल तेलंगे, अधिका चव्हाण, अतुल चालखोर, तेजश्री आटपळकर, मेघा बनसोडे, आदी उपस्थित होते. अध्यासी अधिकारी प्रवीण कुमार शिंदे तर सचिव म्हणून एस.आर. पवार यांनी काम पाहिले.